मग अलीफज तेमानी म्हणाला, “तुझ्याशी मी काही बोललो तर तुला वाईट नाही ना वाटणार? तरी बोलल्यावाचून कोणाच्याने राहवेल? पाहा, तू बहुत जनांस शिक्षण दिले आहेस, आणि दुर्बळ हात सबळ केले आहेत. तुझ्या शब्दांनी ठेचाळत असलेल्यास धीर दिला आहेस, लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहेत; पण तुझ्यावर प्रसंग आला असता तू कष्टी होतोस; तुला दुःखस्पर्श झाला म्हणजे तू घाबरतोस, तुझ्या देवभक्तीचा तुला आश्रय आहे ना? तुझ्या सात्त्विक आचरणावर तुझी आशा आहे ना? कोणी निरपराध असून कधी नाश पावला आहे काय? नीतिमान कधी विलयास गेले आहेत काय? ह्याचा विचार कर. माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात. देवाच्या श्वासाने ते विलय पावतात, त्याच्या क्रोधाच्या फुंकराने ते नाहीतसे होतात. सिंहाची गर्जना खुंटते, विक्राळ सिंहाचा नाद खुंटतो, तरुण सिंहाचे दात उपटले जातात. वृद्ध सिंह भक्ष्य न मिळाल्यामुळे मरतो, सिंहिणीचे छावे चोहोकडे पांगतात. एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानी तिची गुणगुण आली; रात्री माणसे निद्रावश होतात अशा समयी मला दृष्टान्त होऊन मी विचारलहरींत मग्न झालो असता, मला भीती प्राप्त होऊन मी थरथरा कापू लागलो, माझी हाडे लटलटू लागली; माझ्या तोंडाजवळून वायुस्वरूपी1 असा कोणी गेला; तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही; तरी माझ्यासमोर काही आकृती होती; मी मंद वाणी ऐकली की, ‘मर्त्य मानव ईश्वरापुढे नीतिमान ठरेल काय? मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्यापुढे शुद्ध ठरेल काय? पाहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरवसा धरत नाही; तो आपल्या दिव्यदूतांना प्रमाद केल्याचा दोष लावतो; तर मृत्तिकागृहात जे राहतात, ज्यांचा पाय मातीत घातला आहे, त्यांचा त्याच्यापुढे काय पाड! ते पतंगासारखे चिरडले जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या अवकाशात ते छिन्नभिन्न होतात; त्यांचा कायमचा नाश होतो व कोणी त्यांची पर्वा करीत नाही. त्यांच्या राहुटीचा तणावा कापला जात नाही काय? ज्ञानप्राप्तीविना ते मरून जातात.”’
ईयोब 4 वाचा
ऐका ईयोब 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: ईयोब 4:1-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ