YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 34

34
देवाच्या न्याय्यत्वाचे अलीहू समर्थन करतो
1अलीहू आणखी म्हणाला,
2“समंजस लोकहो, तुम्ही माझे बोलणे ऐका; अहो, जाणते लोकहो, कान द्या.
3अन्नाची परीक्षा जशी जिभेला होते, तशी शब्दांची परीक्षा कानाला होते.
4आता न्याय्य असेल ते आपण निवडून घेऊ; चांगले काय ह्याचा आपण आपसांत निवाडा करू.
5आता ईयोब म्हणतो की, ‘मी निर्दोष आहे; देवाने माझ्यावर अन्याय केला आहे;
6माझा पक्ष खरा असता मी खोटा ठरलो आहे; मी निरपराध असता माझा घाय असाध्य आहे.’
7ईश्वरनिंदा उदकाप्रमाणे प्राशन करणारा ईयोबासारखा मनुष्य कोण आहे?
8तो अधर्म करणार्‍यांबरोबर संगती करतो, दुर्जनांची सोबत धरतो.
9तो म्हणतो ‘देवाशी सख्य ठेवून मनुष्याला काय लाभ होतो?’
10ह्याकरता समंजस जनहो, माझे ऐकून घ्या; देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको.
11तो मनुष्याला त्याच्या कर्माचे प्रतिफळ देतो, प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या आचाराप्रमाणे गती देतो.
12देव नि:संशय काही वाईट करीत नाही, सर्वसमर्थ प्रभू विपरीत न्याय करीत नाही.
13ही पृथ्वी त्याच्या स्वाधीन कोणी केली आहे? ह्या सर्व जगाची व्यवस्था कोणी लावली?
14त्याचे चित्त स्वतःकडेच असले, त्याने आपला आत्मा व श्वास आवरून स्वत:च्या ठायी परत घेतला,
15तर सर्व जीवधार्‍यांचा एकदम प्राणान्त होईल; मानव पुन्हा मातीत मिळेल.
16आता समजून घे, हे ऐक; माझ्या तोंडून शब्द निघतील त्यांकडे कान दे.
17जो न्यायाचा वैरी तो शास्ता होईल काय? जो न्यायी, जो समर्थ, त्याला तू दोषी ठरवशील काय?
18‘तू अधम आहेस,’ असे राजाला म्हणणे, ‘तुम्ही दुष्ट आहात’ असे अमिरांना म्हणणे उचित होईल काय?
19जो अमिरांची भीड राखत नाही, जो श्रीमंताला गरिबांहून अधिक मानत नाही, (कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.) त्याला निर्दोष ठरवणे उचित होईल काय?
20लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटका खाऊन गत होतात; बलिष्ठ जन कोणाचा हात न लागता उच्छेद पावतात.
21कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते; त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो.
22अधर्मी ज्यात लपून राहतील असा काळोख, असा घोर अंधकार नाही.
23मनुष्याने देवाच्या न्यायासनापुढे जावे म्हणून त्याला त्याच्याकडे आणखी लक्ष पुरवण्याचे प्रयोजन नसते.
24तो बलिष्ठांचा चुराडा करतो आणि त्यांच्या स्थानी दुसर्‍यांना स्थापतो; त्याला त्यांची चौकशी करावी लागत नाही.
25ह्याप्रमाणे तो त्यांची कृत्ये जाणतो; तो त्यांना रात्री असा उलथून टाकतो की त्यांचा चुराडा होतो.
26ते दुष्ट आहेत म्हणून त्यांना तो लोकांसमक्ष ताडन करतो;
27कारण त्याला अनुसरण्याचे सोडून त्याचा कोणताही मार्ग त्यांनी ध्यानात आणला नाही.
28त्यांच्या करणीमुळे कंगालांचा आक्रोश त्याच्यापर्यंत गेला; दीनांची आरोळी त्याच्या कानी गेली.
29त्याने कोणाला शांतिसमाधान दिले तर त्याला कोण दोष देईल? त्याने तोंड फिरवले तर त्याचे दर्शन कोणाला होईल? हे राष्ट्रासंबंधाने असो की एका व्यक्तीसंबंधाने असो, सारखेच;
30हे अशासाठी की अधर्माचे राज्य होऊ नये, व लोकांना कोणी मोहपाशात घालू नये.
31देवाला कोणी कधी म्हटले काय की ‘मी निरपराध असून शिक्षा भोगली;
32जो माझा अपराध मला दिसत नाही तो मला दाखव; मी जर वाईट केले असेल तर ह्यापुढे मी तसे करणार नाही?’
33देवाकडून मिळणारे प्रतिफळ तुला तुच्छ वाटते; तर ते काय तुझ्या मनाप्रमाणे असावे? तू पाहिजे तर आवडनिवड कर, मी नाही; तुला काय वाटते ते सांग.
34सर्व समंजस लोक, माझे भाषण ऐकणारे सर्व शहाणे पुरुष असे म्हणतील की,
35‘ईयोब अज्ञानाने बोलत आहे; त्याचे बोलणे समंजसपणाचे नाही.’
36शेवटपर्यंत ईयोबाची कसोटी पाहावी हे बरे; कारण दुष्टाप्रमाणे त्याने उत्तरे दिली आहेत.
37आपल्या पापात आणखी अमर्यादेची भर त्याने घातली आहे; आमच्यादेखत तो टाळी वाजवतो आणि देवाविरुद्ध बेसुमार बोलतो.”

सध्या निवडलेले:

ईयोब 34: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन