ईयोब 15
15
अलीफज ईयोबाला दोष देतो
1मग अलीफज तेमानी म्हणाला,
2“सुज्ञ पोकळ ज्ञानाच्या गोष्टी बोलेल काय? आपले अंतर्याम पूर्वेच्या वार्याने भरील काय?
3निष्फळ बोलून निरर्थक भाषणे करून तो वादविवाद करील काय?
4तू तर देवाचे भय सोडले आहेस; तू देवचिंतनाचा संकोच करतोस.
5तुझा अधर्म तुझ्या तोंडाला बोलण्यास शिकवतो; तुला धूर्ताप्रमाणे बोलणे आवडते.
6तुझेच तोंड तुला दोषी ठरवत आहे, मी नाही; तुझ्याच मुखावाटे तुझ्याविरुद्ध साक्ष निघत आहे.
7पहिला पुरुष असा तूच जन्मलास काय? पर्वतांपूर्वी तुझी उत्पत्ती झाली काय?
8देवाचे अंतस्थ रहस्य तुला कळले आहे काय? अकलेचा मक्ता तूच घेतला आहेस काय?
9आम्हांला कळत नाही असे तुला काय ठाऊक आहे? आम्हांला अवगत नाही अशी तुला काय माहिती आहे?
10पिकलेल्या केसांचे, वयाने वृद्ध, तुझ्या बापाहून अधिक वयाचे असे पुरुष आमच्यात आहेत.
11देवाने केलेले सांत्वन आणि तुझ्याशी केलेली सौम्य भाषणे तुला तुच्छ वाटतात काय?
12तुझे चित्त तुला का भ्रांत करीत आहे? तू डोळे का फिरवतोस?
13तुझ्या संतापाचा रोख देवाकडे का? तू आपल्या तोंडावाटे असले शब्द का काढतोस?
14मनुष्य निष्कलंक कोठून असणार? स्त्रीपासून जन्मलेला निर्दोष कोठून असणार?
15पाहा, देव आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरीत नाही; आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही.
16तर जो पाण्यासारखे पातकाचे प्राशन करतो, असल्या अमंगळ व भ्रष्ट मानवाची काय कथा!
17मी तुला समजावून सांगतो; माझे ऐकून घे; मी जे स्वतः पाहिले आहे ते तुला निवेदन करतो;
18(ह्या गोष्टी ज्ञान्यांनी आपल्या वाडवडिलांपासून ऐकून सांगितल्या, गुप्त ठेवल्या नाहीत;
19त्यांनाच काय तो देश दिला होता; कोणा परक्याचा त्यात प्रवेश होत नव्हता;)
20दुर्जन जन्मभर आणि जुलमी मनुष्य त्याची आयुष्यमर्यादा संपेपर्यंत यातना भोगतो.
21दहशतीचा शब्द त्याच्या कानात घुमत असतो; भरभराटीच्या काळात विध्वंसक त्याच्यावर चालून येईल.
22अंधारातून परत येण्याची त्याला आशा नसते; तलवार त्याच्यावर टपलेली असते.
23अन्नान्न करीत तो चोहोकडे भटकतो. अंधकारमय दिवस आपल्यासमीप आहे हे त्याला ठाऊक आहे;
24संकट व क्लेश ही त्याला घाबरवतात; लढाईस सज्ज झालेल्या राजासारखी ती त्याला घेरतात;
25कारण त्याने देवावर हात उचलला आहे, व सर्वसमर्थाशी उद्दामपणा केला आहे.
26त्याने आपली मान ताठ करून, आपल्या ढालीची जाड बोंडे पुढे करून त्याच्यावर हल्ला केला आहे;
27त्याच्या तोंडावर चरबी चढली आहे; त्याच्या कंबरेत चरबी जमली आहे.
28ओसाड नगरात, राहण्यास अयोग्य अशा घरात, ओस व्हावे म्हणून सोडलेल्या जागेत तो राहत आहे.
29तो धनवान व्हायचा नाही, त्याची मत्ता टिकायची नाही; त्याची पिके भाराने भूमीपर्यंत लवणार नाहीत.
30अंधारातून त्याची सुटका होणार नाही; ज्वाला त्याच्या फांद्या सुकवील; तो देवाच्या मुखश्वासाने नाहीसा होईल.
31त्याने स्वतःला फसवून निरर्थक गोष्टीवर भरवसा ठेवू नये; कारण अनर्थ हेच त्याला प्रतिफळ मिळेल.
32त्याचा काळ येण्यापूर्वीच ते तो भोगील; त्याची झावळी हिरवी राहणार नाही.
33द्राक्षांप्रमाणे त्याची अपक्व फळे झडतील; जैतून झाडाच्या फुलांप्रमाणे त्याची फुले गळतील.
34देवहीनांचा परिवार फलहीन होईल; लाच घेणार्यांचे डेरे अग्नी भक्षील.
35त्यांना अपकाराचा गर्भ राहून ते अरिष्टास जन्म देतात; त्यांच्या पोटात कपट उद्भवते.”
सध्या निवडलेले:
ईयोब 15: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.