YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 14

14
आयुष्याच्या क्षणभंगुरतेविषयी ईयोबाचे विचार
1“स्त्रीपासून जन्मलेला मानवप्राणी अल्पायु व क्लेशभरित असतो.
2तो फुलासारखा फुलतो व खुडला जातो; तो छायेप्रमाणे सत्वर निघून जातो, राहत नाही.
3अशावर तू डोळा ठेवतोस काय? अशा मला तू आपल्या न्यायासनासमोर नेतोस काय?
4अमंगळातून काही मंगळ निघते काय? अगदी नाही.
5मानवाच्या आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे; त्याच्या महिन्यांची संख्या तुझ्या स्वाधीन आहे; तू त्याच्या आयुष्याची मर्यादा नेमली आहेस, ती त्याला ओलांडता येत नाही;
6म्हणून त्याच्यावरची आपली दृष्टी काढ व त्याला चैन पडू दे; मजूर रोज भरतो तसे त्याला आपले दिवस भरू दे.
7वृक्षांची काहीतरी आशा असते; तो तोडला तरी पुन्हा फुटतो; त्याला धुमारा फुटायचा राहत नाही.
8जमिनीत त्याचे मूळ जून झाले असले, त्याचे खोड मातीत सुकून गेले असले;
9तरी पाण्याच्या वासाने ते पुन्हा फुटते, नव्या रोपाप्रमाणे त्याला फांद्या येतात;
10पण मनुष्य मेला म्हणजे तो तसाच पडून राहतो; मनुष्याने प्राण सोडला म्हणजे तो कोठे असतो?
11समुद्राचे पाणी आटून जाते, नदी आटून कोरडी होते;
12तसा मनुष्य पडला म्हणजे तो पुन्हा उठत नाही; आकाशाचा विलय होईतोवर तो जागृत होणार नाही; आणि त्याला झोपेतून कोणी जागे करणार नाही.
13तू मला अधोलोकात लपवशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेवशील, माझी मदत नियमित करून मग माझी आठवण करशील तर किती बरे होईल!
14मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन.
15तू मला हाक मारशील व मी तुला उत्तर देईन; मी जो तुझ्या हातची कृती त्या माझ्याविषयी तुला उत्कंठा लागेल;
16पण सध्या तू माझे एकेक पाऊल मोजत आहेस; माझ्या पापावर तू सक्त नजर ठेवत आहेस ना?
17माझे पातक थैलीत घालून मोहरबंद केले आहेस; माझा अधर्म तू वज्रलेप करून ठेवतोस.
18पर्वत कोसळून कोसळून लय पावतो; खडक आपल्या जागचा ढळतो;
19पाण्याने पाषाण झिजतो; त्याच्या पुराने पृथ्वीवरील माती वाहून जाते; त्याप्रमाणे तू मनुष्याची आशाही नष्ट करतोस.
20तू त्याला कायमचा जेरीस आणतोस, आणि तो गत होतो; तू त्याची चर्या बदलून त्याला घालवून देतोस.
21त्याच्या पुत्रांची उन्नती होते ती त्याला कळत नाही; त्यांची अवनती होते ती त्याला दिसत नाही.
22त्याच्या देहाला दु:ख होते, त्याचे अंतर्याम शोकाकुल होते.”

सध्या निवडलेले:

ईयोब 14: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन