YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 9:1-11

योहान 9:1-11 MARVBSI

तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? ह्याच्या किंवा ह्याच्या आईबापांच्या?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला2 केली पाहिजेत; रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” असे बोलून तो भूमीवर थुंकला, थुंकीने त्याने चिखल केला; आणि तो चिखल त्या आंधळ्याच्या डोळ्यांना लावला, आणि त्याला म्हटले, “जा; शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू.” मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. ह्यावरून शेजारीपाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय?” कित्येक म्हणाले, “तोच हा.” दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे;” तो म्हणाला, “मी तोच आहे.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुझे डोळे कसे उघडले?” त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यांना लावला आणि मला सांगितले, ‘शिलोह तळ्यावर जाऊन धू.’ मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.”

योहान 9:1-11 साठी चलचित्र