YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 6:1-24

योहान 6:1-24 MARVBSI

ह्यानंतर येशू गालीलाच्या म्हणजे तिबिर्या समुद्राच्या पलीकडे गेला. तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी लोकांसाठी जी चिन्हे तो करत असे ती त्यांनी पाहिली होती. येशू डोंगरावर जाऊन तेथे आपल्या शिष्यांसह बसला. यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता. तेव्हा येशू दृष्टी वर करून व आपणाकडे मोठा लोकसमुदाय येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “ह्यांना खायला आपण भाकरी कोठून विकत आणाव्यात?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत, हे त्याला ठाऊक होते. फिलिप्पाने त्याला उत्तर दिले, “ह्यांच्यातील एकेकाने थोडेथोडे घेतले तरी दोनशे रुपयांच्या भाकरी पुरणार नाहीत.” त्याच्या शिष्यांपैकी एक जण, म्हणजे शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्याला म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांना बसवा.” त्या ठिकाणी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरुष होते, ते बसले. येशूने त्या भाकरी घेतल्या; आणि आभार मानल्यावर शिष्यांना आणि शिष्यांनी बसलेल्यांना वाटून दिल्या; तसेच त्या मासळ्यांतूनही त्यांना पाहिजे तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “काही फुकट जाऊ नये म्हणून उरलेले तुकडे गोळा करा.” मग जेवणार्‍यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरीचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा येशूने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच होय.” मग ते येऊन आपणास राजा करण्याकरता बळजबरीने धरण्याच्या बेतात आहेत हे ओळखून येशू पुन्हा डोंगरावर एकटाच निघून गेला. संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य खाली समुद्राकडे गेले, आणि मचव्यात बसून समुद्राच्या पलीकडे कफर्णहूमास जाऊ लागले. एवढ्यात अंधार पडला, तोपर्यंत येशू त्यांच्याजवळ आला नव्हता. आणि मोठा वारा सुटून समुद्र खवळू लागला होता. मग सुमारे कोस सव्वा कोस वल्हवून गेल्यावर त्यांनी येशूला समुद्रावरून मचव्याच्या जवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले; परंतु तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” म्हणून त्याला मचव्यात घेण्याची त्यांना इच्छा झाली; तेवढ्यात त्यांना जायचे होते त्या ठिकाणी मचवा किनार्‍यास लागला. दुसर्‍या दिवशी जो लोकसमुदाय समुद्राच्या पलीकडे उभा होता त्याने पाहिले की, ज्या लहान मचव्यात त्याचे शिष्य बसले होते त्याच्याशिवाय तेथे दुसरा मचवा नव्हता, आणि येशू आपल्या शिष्यांबरोबर त्या मचव्यावर चढला नव्हता, तर त्याचे शिष्य मात्र निघून गेले होते. तरी जेथे प्रभूने आभार मानल्यावर त्यांनी भाकर खाल्ली होती त्या ठिकाणाजवळ तिबिर्याहून दुसरे लहान मचवे आले होते. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाहीत असे लोकसमुदायाने पाहिले तेव्हा ते लहान मचव्यांत बसून येशूचा शोध करत कफर्णहूमास आले.