YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:7-30

योहान 4:7-30 MARVBSI

तेथे शोमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि ‘मला प्यायला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.” ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली; तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?” येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.” तो तिला म्हणाला, “तू जाऊन आपल्या नवर्‍याला बोलावून आण.” ती स्त्री म्हणाली, “मला नवरा नाही.” येशूने तिला म्हटले, “मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस.” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.” येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” ती स्त्री त्याला म्हणाली, “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल.” येशू तिला म्हणाला, “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे.” इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्‍चर्य वाटले; तरी “आपण काय विचारत आहात” किंवा “आपण तिच्याबरोबर का बोलत आहात” असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, “चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?” तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.

योहान 4:7-30 साठी चलचित्र