YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:4-42

योहान 4:4-42 MARVBSI

आणि त्याला शोमरोनामधून जावे लागले. मग तो शोमरोनामधून सूखार नावाच्या नगरास आला; ते याकोबाने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झर्‍यावर बसला; तेव्हा सुमारे सहावा तास होता. तेथे शोमरोनाची एक स्त्री पाणी काढण्यास आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहूदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यायला पाणी मागता हे कसे?” कारण यहूदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात. येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि ‘मला प्यायला पाणी दे,’ असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.” ती त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तर खोल आहे, मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हांला दिली; तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय?” येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढायला मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या.” तो तिला म्हणाला, “तू जाऊन आपल्या नवर्‍याला बोलावून आण.” ती स्त्री म्हणाली, “मला नवरा नाही.” येशूने तिला म्हटले, “मला नवरा नाही हे ठीक बोललीस, कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरे सांगितलेस.” ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.” येशू तिला म्हणाला, “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहूद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे; किंबहुना आलीच आहे; कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” ती स्त्री त्याला म्हणाली, “मशीहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल.” येशू तिला म्हणाला, “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तो मी तोच आहे.” इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्‍चर्य वाटले; तरी “आपण काय विचारत आहात” किंवा “आपण तिच्याबरोबर का बोलत आहात” असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, “चला, मी केलेले सर्वकाही ज्याने मला सांगितले, तो मनुष्य पाहा; तोच ख्रिस्त असेल काय?” तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरूजी, जेवा.” परंतु तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खायला आहे.” ह्यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “ह्याला कोणी खायला आणले असेल काय?” येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. ‘अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल’ असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हांला म्हणतो, आपली नजर वर करून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकत्र करतो; ह्यासाठी की, पेरणार्‍याने व कापणी करणार्‍यानेही एकत्र आनंद करावा. ‘एक पेरतो व एक कापतो,’ अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसर्‍यांनी श्रम केले होते व तुम्ही त्यांच्या श्रमांचे वाटेकरी झाला आहात.” “मी केलेले सर्वकाही त्याने मला सांगितले” अशी साक्ष देणार्‍या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला. आणि ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचीत ख्रिस्त, जगाचा तारणारा आहे हे आम्हांला कळले आहे.”

योहान 4:4-42 साठी चलचित्र