YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 3:1-15

योहान 3:1-15 MARVBSI

परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हांला ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.” येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” निकदेम त्याला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसर्‍यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. ‘तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे’ असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्‍चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?” येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.1

योहान 3:1-15 साठी चलचित्र