आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेस अंधारातच मरीया मग्दालीया कबरेजवळ आली, आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्यांच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, “त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कोठे ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.” ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले; आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहचला; त्याने ओणवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून येऊन पोहचला व कबरेत शिरला; आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्रांजवळ नव्हे, तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. कारण ‘त्याने मेलेल्यांमधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे’ हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले. आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, “बाई, का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले व त्याला कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून.” असे बोलून ती पाठमोरी फिरली, तेव्हा तिला येशू उभा असलेला दिसला; परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई, का रडतेस? कोणाचा शोध करतेस?” तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असलेस तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन.” येशूने तिला म्हटले, “मरीये!” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी!” (म्हणजे गुरूजी!) येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस; कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” मरीया मग्दालीया गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले.
योहान 20 वाचा
ऐका योहान 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 20:1-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ