YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 17:1-12

योहान 17:1-12 MARVBSI

ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “हे माझ्या पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझा गौरव करावा म्हणून तू आपल्या पुत्राचा गौरव कर; कारण जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे म्हणून तू मनुष्यमात्रावर त्याला अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. जे काम तू मला करायला दिलेस ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझा गौरव केला आहे. तर आता हे माझ्या पित्या, जग होण्यापूर्वी जो माझा गौरव तुझ्याजवळ होता त्याच्या योगे तू आपणाजवळ माझा गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रकट केले; ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस; आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते सर्व तुझ्यापासून आहे. कारण जी वचने तू मला दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली; मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवलेस असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो; मी जगासाठी विनंती करत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी; कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे, आणि जे तुझे ते माझे आहे, आणि त्यांच्या ठायी माझा गौरव झाला आहे. ह्यापुढे मी जगात नाही, पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे. जोपर्यंत मी जगात त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला, आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही; शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले.

योहान 17:1-12 साठी चलचित्र