YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 16:16-33

योहान 16:16-33 MARVBSI

थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही; आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल. [कारण मी पित्याकडे जातो.]” ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी काही एकमेकांना म्हणाले, “हा आम्हांला, ‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ शिवाय, ‘कारण मी पित्याकडे जातो,’ असे जे म्हणतो त्याचा अर्थ काय?” ते म्हणत होते, “‘थोड्या वेळाने,’ असे जे हा म्हणतो ह्याचा अर्थ काय? तो काय म्हणतो हे आम्हांला समजत नाही.” आपणाला विचारावे असे त्यांच्या मनात आहे हे ओळखून येशू त्यांना म्हणाला, “‘थोड्या वेळाने मी तुम्हांला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल,’ हे जे मी म्हणालो, त्याविषयी तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय? मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही रडाल व शोक कराल तरी जग आनंद करील; तुम्हांला दुःख होईल, तरी तुमचे दुःखच तुमचा आनंद होईल. स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; परंतु बालक जन्मल्यावर मनुष्य जगात जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशांची आठवण होत नाही. ह्याप्रमाणे तुम्हांला आता दुःख झाले आहे; तरी मी तुम्हांला पुन्हा भेटेन, आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल व तुमचा आनंद तुमच्यापासून कोणी काढून घेणार नाही. त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्‍न विचारणार नाहीत. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हांला माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही. मागा म्हणजे तुम्हांला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. ह्या गोष्टी मी तुम्हांला अन्योक्तीने सांगितल्या आहेत; मी तुमच्याबरोबर अन्योक्तीने आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हांला उघड सांगेन अशी घटका येत आहे. त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल. आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन, असे मी तुम्हांला म्हणत नाही; कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे. मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा जग सोडून मी पित्याकडे जात आहे.” त्याचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता आपण उघड बोलता, अन्योक्तीने काही सांगत नाही. आता आम्हांला कळले आहे की, आपल्याला सर्वकाही कळते, आणि कोणी आपणाला विचारावे ह्याची आपणाला गरज नाही; ह्यावरून आपण देवापासून आला आहात असा आम्ही विश्वास धरतो.” येशूने त्यांना उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास धरता काय? पाहा, अशी वेळ येत आहे, किंबहुना आली आहे, की तुमची दाणादाण होऊन तुम्ही सर्व आपापल्या घरी जाल व मला एकटे सोडाल; तरी मी एकटा नाही, कारण पिता माझ्याबरोबर आहे. माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”