दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा’ इस्राएलाचा राजा ‘धन्यवादित असो!’ येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. “हे सीयोनेच्या कन्ये, भिऊ नकोस; पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो!” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या; परंतु येशूचा गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. त्याने लाजराला कबरेतून बोलावून मेलेल्यांतून उठवले, त्या वेळेस जो लोकसमुदाय त्याच्याबरोबर होता त्याने त्याबद्दल साक्ष दिली. त्याने हे चिन्ह केले होते असे त्यांनी ऐकले म्हणूनही लोक त्याला भेटण्यास गेले. मग परूशी एकमेकांना म्हणाले, “तुमचे काही चालत नाही हे लक्षात आणा; पाहा, जग त्याच्यामागे चालले आहे.” सणात उपासना करण्यास आलेल्या लोकांपैकी काही हेल्लेणी होते. त्यांनी गालीलातील बेथसैदाकर फिलिप्प ह्याच्याजवळ येऊन विनंती केली की, “महाराज, येशूला भेटावे अशी आमची इच्छा आहे.” फिलिप्पाने येऊन अंद्रियाला सांगितले; आणि अंद्रिया व फिलिप्प ह्यांनी येऊन येशूला सांगितले. येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचा गौरव होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो, आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जिवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल, आणि जो ह्या जगात आपल्या जिवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल; जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील. आता माझा जीव व्याकूळ झाला आहे; मी काय बोलू? हे बापा, ह्या घटकेपासून माझे रक्षण कर; परंतु मी ह्यासाठीच ह्या घटकेत आलो आहे. हे बापा, तू आपल्या नावाचा गौरव कर.” तेव्हा अशी आकाशवाणी झाली की, “मी ते गौरवले आहे आणि पुन्हाही गौरवीन.” तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, “मेघगर्जना झाली.” दुसरे म्हणाले, “त्याच्याबरोबर देवदूत बोलला.” येशूने उत्तर दिले, “ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल; आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.” आपण कोणत्या मरणाने मरणार हे सुचवण्याकरता तो असे बोलला. म्हणून लोकांनी त्याला विचारले, “ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रातून ऐकले आहे, तर मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण?” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे म्हणून तुमच्याजवळ प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा.” येशू ह्या गोष्टी बोलला आणि तेथून निघून जाऊन त्यांच्यापासून गुप्त राहिला.
योहान 12 वाचा
ऐका योहान 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 12:12-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ