मी त्याला ओळखत नव्हतो, तरी त्याने इस्राएलास प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करत आलो आहे.”
आणि योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला.
मी तर त्याला ओळखत नव्हतो; तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करण्यास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ‘ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’
मी स्वत: पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
त्यानंतर दुसर्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघांसह पुन्हा उभा असता,
येशूला जाताना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!”
त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागोमाग निघाले.
तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधता?” ते त्याला म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?”
तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले. तेव्हा सुमारे दहावा तास होता.
योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता.
त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे.”
त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस; तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.”
दुसर्या दिवशी त्याने गालीलात जाण्याचा बेत केला, तेव्हा फिलिप्प त्याला भेटला; येशूने त्याला म्हटले, “माझ्या-मागून ये.”
फिलिप्प हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेथसैदा येथला होता.
फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेष्ट्यांनी लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेथकर आम्हांला सापडला आहे.”
नथनेल त्याला म्हणाला, “नासरेथातून काहीतरी उत्तम निघू शकते काय?” फिलिप्प त्याला म्हणाला, “येऊन पाहा.”
नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!”
नथनेल त्याला म्हणाला, “आपणाला माझी ओळख कोठली?” येशूने त्याला उत्तर दिले, “फिलिप्पाने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले.”
नथनेल त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहात, आपण इस्राएलाचे राजे आहात.”
येशू त्याला म्हणाला, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय? ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.”
आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.”