YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 7:1-15

यिर्मया 7:1-15 MARVBSI

यिर्मयाला परमेश्वरापासून वचन प्राप्त झाले ते हे : “परमेश्वराच्या मंदिराच्या द्वारात उभा राहा व हे वचन जाहीर कर : यहूदाचे सर्व लोकहो, परमेश्वराचे भजनपूजन करण्यासाठी ह्या द्वारांनी आत जाता ते तुम्ही सर्व परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर; इस्राएलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे ह्या स्थळी मी तुमची वस्ती करवीन. ‘हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका. जर तुम्ही आपले मार्ग व आपली कृती पूर्णपणे सुधाराल, माणसामाणसांत खरा न्याय कराल, परका, पोरका व विधवा ह्यांना जाचणार नाही, ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही, तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. पाहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. हे काय? तुम्ही चोरी, खून, व्यभिचार करता, खोटी शपथ वाहता, बआलाच्या मूर्तीला धूप दाखवता व ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा अन्य देवांच्या मागे लागता आणि मग येऊन ज्या मंदिराला मी आपले नाम दिले आहे त्यात माझ्यासमोर उभे राहता व आमची मुक्ती झाली आहे म्हणून ही सर्व अमंगळ कृत्ये करण्यास आम्हांला हरकत नाही, असे मनात म्हणता. माझे नाम दिलेले हे मंदिर तुमच्या दृष्टीने लुटारूंची गुहा झाले आहे काय? पाहा, हे माझ्या लक्षात येऊन चुकले आहे, असे परमेश्वर म्हणतो. तर ज्या स्थळी माझे नाम राहावे असे मी प्रथम योजले होते त्या शिलोस जा व माझे लोक इस्राएल ह्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचे काय केले ते पाहा. परमेश्वर म्हणतो, तुम्ही ही सर्व कृत्ये केली, मी तुमच्याशी मोठ्या निकडीने बोलत असता तुम्ही माझे ऐकले नाही; मी तुम्हांला हाक मारीत असता तुम्ही उत्तर दिले नाही; म्हणून ज्याला माझे नाम दिले आहे व ज्यावर तुमची श्रद्धा आहे त्या ह्या मंदिराचे आणि तुम्हांला व तुमच्या पूर्वजांना मी दिलेल्या ह्या स्थळाचे, शिलोचे केले तसे करीन; आणि तुमचे सर्व भाऊबंद, एफ्राइमाचे सर्व संतान ह्यांना घालवून दिले, त्याप्रमाणे मी तुम्हांला माझ्यासमोरून घालवून देईन.