यिर्मया 37
37
यिर्मयाचा बंदिवास
1यहोयाकीमाचा पुत्र कोन्या1 ह्याच्या जागी योशीयाचा पुत्र सिद्कीया राज्य करू लागला; ह्याला बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने यहूदा देशावर राजा केले होते.
2परंतु त्याने, त्याच्या सेवकांनी व देशाच्या लोकांनी, यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे जी वचने परमेश्वराने सांगितली होती ती ऐकली नाहीत.
3तेव्हा सिद्कीया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक ह्यांना यिर्मया संदेष्ट्याकडे सांगून पाठवले की, “आमच्यासाठी आमचा देव परमेश्वर ह्याच्याकडे प्रार्थना कर.”
4त्या वेळी यिर्मयाचे लोकांत जाणेयेणे होते, कारण त्याला अद्यापि बंदिशाळेत टाकले नव्हते.
5त्या समयी मिसर देशातून फारोचे सैन्य आले; ही वार्ता ऐकून यरुशलेमेस वेढा घालणारे खास्दी यरुशलेम सोडून गेले.
6तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मया संदेष्ट्याला प्राप्त झाले ते असे :
7“परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, यहूदाच्या राजाने तुम्हांला माझ्याकडे विचारण्यास पाठवले आहे, तर त्याला सांगा, पाहा, फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे ते मिसरास स्वदेशी परत जाईल.
8खास्दी लोक परत येऊन ह्या नगराशी लढतील व ते घेऊन अग्नीने जाळतील.
9परमेश्वर म्हणतो, ‘खास्दी लोक आम्हांला खरोखर सोडून जातील’, असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका; ते निघून जाणार नाहीत.
10कारण तुमच्याबरोबर लढणार्या खास्द्यांच्या अवघ्या सैन्याचा जरी तुम्ही पराभव केला व त्यांच्यातले अगदी घायाळ झालेले मात्र काही उरले तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळतील.”
11फारोच्या सैन्याच्या भीतीने खास्द्यांचे सैन्य यरुशलेम सोडून गेले तेव्हा असे झाले की,
12लोकांतला आपला वाटा मिळवावा म्हणून यिर्मया यरुशलेमेहून बन्यामीन प्रांतात जाण्यास निघाला.
13तो बन्यामिनाच्या वेशीत प्रवेश करतो तर तेथे पहारेकर्यांचा नायक इरीया बिन शलेम्या बिन हनन्या होता; त्याने यिर्मया संदेष्ट्याला पकडून म्हटले, “तू खास्द्यांकडे फितूर होऊन जात आहेस.”
14यिर्मया म्हणाला, “हे खोटे आहे; मी खास्द्यांकडे फितूर होऊन जात नाही.” पण इरीया त्याचे ऐकेना; त्याने यिर्मयाला पकडून सरदारांकडे नेले.
15सरदारांनी यिर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनाथान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेवले, त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता.
सिद्कीया यिर्मयाशी विचारविनिमय करतो
16यिर्मया तेथल्या तळघरात व अंधारकोठड्यांत राहिला; तेथे त्याने बहुत दिवस काढले.
17मग सिद्कीया राजाने त्याला बोलावून आणले; तेव्हा राजाने आपल्या राजवाड्यात त्याला एकान्ती विचारले की, “परमेश्वराकडचे काही वचन आहे काय?” यिर्मया म्हणाला, “आहे.” मग तो म्हणाला, “आपणांला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल.”
18यिर्मया सिद्कीया राजाला आणखी म्हणाला, “मी आपल्याविरुद्ध, आपल्या सेवकांविरुद्ध किंवा ह्या लोकांविरुद्ध कोणते पाप केले की, तुम्ही मला तुरुंगात टाकले?
19तुमच्या ज्या संदेष्ट्यांनी भविष्य केले की, ‘बाबेलचा राजा तुमच्यावर व ह्या देशावर चाल करून येणार नाही ते कोठे आहेत?’
20आता, अहो माझे स्वामीराज, माझे ऐका; माझी विनंती आपणांला मान्य होवो; मला त्या योनाथान लेखकाच्या घरात परत पाठवू नका, पाठवाल तर मी तेथे मरेन.”
21मग सिद्कीया राजाच्या आज्ञेने त्यांनी यिर्मयाला पहारेकर्यांच्या चौकात ठेवले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटारआळीतून रोज त्याला एक भाकर मिळत असे. ह्याप्रमाणे यिर्मया पहारेकर्यांच्या चौकात राहिला.
सध्या निवडलेले:
यिर्मया 37: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.