YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 29:1-14

यिर्मया 29:1-14 MARVBSI

मग पकडून नेलेल्या लोकांतील अवशिष्ट वडील, याजक, संदेष्टे व जे सर्व लोक नबुखद्नेस्सराने पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले होते त्या सर्वांना यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमेहून पत्र पाठवले. यकन्या राजा, राजमाता, खोजे, यहूदाचे व यरुशलेमेचे सरदार, कारागीर व लोहार हे यरुशलेमेतून गेल्यावर ते त्याने पाठवले. ते शाफानाचा पुत्र एलासा व हिल्कीयाचा पुत्र गमर्‍या ह्यांच्या हस्ते रवाना केले; त्यांना यहूदाचा राजा सिद्कीया ह्याने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्याकडे बाबेलास पाठवले; त्या पत्रातील मजकूर असा होता : “सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेल्यांना मी असे म्हणतो : तुम्ही घरे बांधून त्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा; बायका करून पुत्र व कन्या ह्यांना जन्म द्या; आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील; तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका. तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित. कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुमच्यात वागणारे संदेष्टे व तुमचे दैवज्ञ ह्यांनी तुम्हांला फसवू नये; तुम्ही ज्यांना स्वप्ने पाहण्यास लावता त्या स्वप्नद्रष्ट्यांचे ऐकू नका. कारण ते माझ्या नामाने तुम्हांला खोटा संदेश देतात; मी त्यांना पाठवले नाही, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर असे म्हणतो की बाबेलची सत्तर वर्षे भरल्यावर मी तुमचा समाचार घेईन व तुम्हांला ह्या स्थळी परत आणण्याचे जे माझे सुवचन आहे ते तुमच्यासंबंधाने पूर्ण करीन. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हांला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हांला पावेन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हांला पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकांत व ज्या स्थळी मी तुम्हांला हाकून लावले आहे तेथून तुम्हांला एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो; आणि ज्या स्थळाहून मी तुम्हांला पकडून न्यायला लावले त्या स्थळी तुम्हांला परत आणीन.