परमेश्वर, इस्राएलाचा देव, मला म्हणाला की, “माझ्या हातून संतापरूप द्राक्षारसाचा हा पेला घे व ज्या सर्व राष्ट्रांकडे मी तुला पाठवतो त्यांना तो पाज;
म्हणजे ते तो पितील, आणि त्यांच्यामध्ये मी तलवार पाठवीन. तिच्यामुळे ते तेथे झोकांड्या खातील व वेडे बनतील.”
तेव्हा परमेश्वराच्या हातून मी तो प्याला घेतला व ज्या राष्ट्रांकडे परमेश्वराने मला पाठवले त्या सर्वांना तो पाजला;
म्हणजे यरुशलेम व यहूदाची नगरे ही उद्ध्वस्त व्हावी आणि राजे व सरदार विस्मय, उपहास व शाप ह्यांचे विषय व्हावेत म्हणून त्यांना तो पाजला; आज त्यांची तशी स्थिती आहे.
मिसर देशाचा राजा फारो, त्याचे सेवक, त्याचे सरदार व त्याचे सर्व लोक ह्यांना,
सर्व मिश्र जातींना, ऊस देशातील सर्व राजांना आणि पलिष्टी देशातील अश्कलोन, गज्जा, एक्रोन व अश्दोदाचे अवशेष ह्यांच्या सर्व राजांना,
अदोम, मवाब व अम्मोनी लोक ह्यांना,
सोर व सीदोन ह्यांचे सर्व राजे व समुद्रापलीकडील देशांचे राजे ह्यांना,
ददान, तेमा, बूज व केसांची चोंच काढणारे ह्या सर्वांना,
अरबस्तानातले सर्व राजे व रानात वसणार्या सर्व मिश्र जातींचे सर्व राजे ह्यांना,
जिम्री, एलाम व मेदी ह्यांच्या सर्व राजांना,
परस्परांपासून दूर व जवळ असलेले उत्तरेकडचे सर्व राजे व ह्या भूतलावर असलेली पृथ्वीवरची सर्व राज्ये, ह्यांना तो पेला पाजला. ह्यांच्यामागून शेशखचा1 राजाही तो पिईल.
“तू त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतो म्हणून प्या, मस्त व्हा, वांती करा, पडा, पुन्हा उठू नका.’
जर ते तुझ्या हातून तो पेला घेऊन पिण्यास अमान्य झाले तर त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्हांला तो प्यावा लागेलच.
कारण पाहा, ज्या नगराला मी आपले नाम दिले आहे त्यावरही मी अरिष्ट आणतो, तर तुम्ही अगदी शिक्षेवाचून राहाल काय? तुम्हांला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, कारण पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना मारण्यासाठी मी तलवार बोलावत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.’
ह्यास्तव तू त्यांना ह्या सर्व वचनांचा संदेश सांग; त्यांना असे सांग की, ‘परमेश्वर उच्च स्थलावरून गर्जना करील; तो आपल्या पवित्र निवासातून शब्द उच्चारील; तो आपल्या कळपावर गर्जना करील; द्राक्षे तुडवणार्यांप्रमाणे तो पृथ्वीच्या सर्व रहिवाशांविरुद्ध आरोळी करील.
पृथ्वीच्या दिगंतापर्यंत हा गोंगाट पोहचला आहे; कारण मी परमेश्वर राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे, मी सर्व मानवजातीबरोबर वाद घालीत आहे, व दुष्टांना तलवारीच्या स्वाधीन करीत आहे, असे परमेश्वर म्हणतो.’
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, राष्ट्राराष्ट्रांतून अरिष्ट फिरत आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल.
त्या दिवशी परमेश्वराने वध केलेले, पृथ्वीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील; त्यांच्याकरता कोणी शोक करणार नाही, त्यांना कोणी उचलणार नाही, पुरणार नाही; ते भूमीला खत होतील.
मेंढपाळहो, हायहाय करा, ओरडा; कळपांचे प्रमुखहो, राखेत लोळा; कारण तुमच्या वधाचे दिवस भरले आहेत, मोलवान भांडे पडून भंगते तसे तुम्ही पडाल, अशी मी तुमची दाणादाण करीन.
मेंढपाळांना पळायला मार्ग राहणार नाही, कळपांचे प्रमुख निभावणार नाहीत.
मेंढपाळांची आरोळी ऐका! कळपाच्या प्रमुखांची हायहाय ऐका! कारण परमेश्वर त्यांचे कुरण उद्ध्वस्त करीत आहे.
परमेश्वराच्या संतप्त क्रोधामुळे शांतिमय कुरणे सामसूम झाली आहेत.
तरुण सिंहाप्रमाणे त्याने आपली जाळी सोडली आहे; क्लेश देणार्या तलवारीने व त्याच्या क्रोधाच्या संतापाने त्यांचा देश उजाड झाला आहे.”