YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 24:2-10

यिर्मया 24:2-10 MARVBSI

एका टोपलीत पहिल्या बाराच्या अंजिरांसारखे फार चांगले अंजीर होते; दुसर्‍या टोपलीत फार वाईट अंजीर होते, इतके की ते खाण्याजोगे नव्हते. परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “अंजीर; चांगले ते फार चांगले आहेत आणि वाईट ते फार वाईट आहेत, इतके की ते खाण्याजोगे नाहीत.” मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, ह्या ठिकाणाहून यहूदाचे बंदिवान केलेले जे लोक मी खास्द्यांच्या देशात पाठवले आहेत त्यांना ह्या चांगल्या अंजिरांप्रमाणे मी समजेन. मी त्यांच्यावर कृपादृष्टी करीन; आणि त्यांना ह्या देशात परत आणीन; त्यांना उभारीन, पाडून टाकणार नाही; त्यांची लागवड करीन, त्यांना उपटून टाकणार नाही. मी परमेश्वर आहे असे मला ओळखणारे हृदय मी त्यांना देईन; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन; कारण ते मनापासून माझ्याकडे वळतील. परमेश्वर खरोखर म्हणतो, खाण्याजोगे नाहीत असे जे वाईट अंजीर आहेत त्यांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया व त्याचे सरदार, आणि ह्या देशात राहिलेले व मिसर देशात वस्ती करून राहिलेले यरुशलेमेचे अवशिष्ट लोक ह्यांचे मी करीन. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना दहशत पोहचेल असे मी त्यांचे करीन; आणि जेथे मी त्यांना हाकून देईन तेथे ते अपशब्द व लोकप्रवाद, निंदा व शाप ह्यांचे विषय होतील. आणि मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन, अशी की जो देश मी त्यांना व त्यांच्या पूर्वजांना दिला त्यातून त्यांचा नायनाट होईल.”