YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 22:1-23

यिर्मया 22:1-23 MARVBSI

परमेश्वर म्हणतो, “यहूदाच्या राजाच्या घरी खाली जा आणि तेथे हे वचन बोल. असे म्हण : ‘दाविदाच्या सिंहासनावर बसणार्‍या यहूदाच्या राजा, तू, तुझे दास व ह्या वेशींनी येजा करणारे तुझे लोक असे तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो : तुम्ही न्यायनिवाडा करा; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडवा; परका, पोरका व विधवा ह्यांच्यावर अन्याय करू नका; त्यांना उपद्रव देऊ नका; ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडू नका. तुम्ही ह्याप्रमाणे वागाल तर खरोखर दाविदाच्या सिंहासनावर बसणारे राजे, त्यांचे सेवक व त्यांचे लोक रथारूढ व अश्वारूढ होऊन ह्या मंदिराच्या वेशीतून येजा करतील.”’ परमेश्वर म्हणतो, “माझी शपथ, तुम्ही ही वचने ऐकली नाहीत तर हे मंदिर ओस पडेल. कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो : तू मला गिलाद, लबानोनाचे शिखर असे आहेस; मी तुला खातरीने ओसाड भूमीसारखे, निर्जन नगरासारखे करीन. मी तुझ्याविरुद्ध विध्वंसक त्यांच्या शस्त्रांनिशी सिद्ध करीन; ते तुझे निवडक गंधसरू तोडून अग्नीत टाकतील. बहुत राष्ट्रांतील लोक ह्या नगराजवळून जातील; ते एकमेकांना म्हणतील की, ‘परमेश्वराने ह्या मोठ्या नगराचे असे का केले?’ तेव्हा ते उत्तर देतील की, ‘त्यांनी आपला देव परमेश्वर ह्याचा करार मोडला व अन्य देवांना भजून त्यांची सेवा केली म्हणून.”’ मृतासाठी रडू नका, त्याच्याकरता शोक करू नका; तर देशांतर करणार्‍यासाठी आक्रोश करा; कारण तो परत येणार नाही, त्याला त्याच्या जन्मभूमीचे पुन्हा दर्शन होणार नाही. यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र शल्लूम1 हा आपला बाप योशीया ह्याच्या जागी राजा होऊन ह्या ठिकाणाहून गेला, त्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “तो येथे कधी परत येणार नाही; तर जेथे त्याला बंदिवान करून नेले आहे तेथेच तो मरेल; ह्या देशाचे दर्शन त्याला पुन्हा होणार नाही.” “जो आपले घर अधर्माने बांधतो, आपल्या माड्या अन्यायाने उभारतो, आपल्या शेजार्‍याकडून फुकट सेवा करून घेतो, त्याला वेतन देत नाही, तो हायहाय करणार. तो म्हणतो, ‘मी आपल्यासाठी विस्तीर्ण घर व लांबरुंद माड्या बांधीन.’ तो त्याला बहुत खिडक्या पाडतो; त्याने घरास गंधसरूची तक्तपोशी केली आहे, हिंगुळाचा रंग दिला आहे. तू गंधसरूची शेखी मिरवतोस म्हणून तू राजा ठरशील काय? तुझा बाप खातपीत व न्यायाने व नीतीने वागत नसे काय? तेव्हा त्याचे बरे चालले होते. दीनदुबळ्यांचा तो न्यायनिवाडा करी तेव्हा त्याचे बरे चालले होते. परमेश्वर म्हणतो, हेच मला जाणणे नव्हे काय? तरीपण केवळ निर्दोष्यांचा रक्तपात, जुलूमजबरी व अन्याय्य धनप्राप्ती ह्यांकडे तुझे डोळे व मन लागले आहे.” ह्याकरता यहूदाचा राजा योशीया ह्याचा पुत्र यहोयाकीम ह्याच्याविषयी परमेश्वर म्हणतो, “‘अहारे माझ्या भावा, अहागे माझ्या बहिणी,’ असे म्हणून कोणी त्याच्याविषयी विलाप करणार नाहीत; ‘अहारे माझा धनी, अहारे त्याची थोरवी,’ असे म्हणून त्याच्याविषयी कोणी विलाप करणार नाहीत. गाढवाच्या मूठमातीसारखी त्याची मूठमाती होईल; त्याचे शव यरुशलेमेच्या वेशींबाहेर ओढत नेऊन फेकून देतील.” “लबानोनावर चढून आक्रोश कर; बाशानात हेल काढून रड; अबारीमाहून आरोळी कर; कारण तुझे सर्व वल्लभ भंगले आहेत. तुझी सुखसोय असता मी तुझ्याबरोबर बोललो, तेव्हा तू म्हणालीस, ‘मी ऐकणार नाही.’ माझे म्हणणे ऐकू नये ही लहानपणापासून तुला खोड आहे. वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना उधळून लावील, तुझे वल्लभ बंदिवान होतील; तेव्हा तू आपल्या सर्व दुष्टतेमुळे लज्जित व फजीत होशील. अगे लबानोनवासिनी, गंधसरूंवर घरटे करणारे, तुला तिडका येतील; प्रसूत होणार्‍या स्त्रीप्रमाणे तू वेणा देशील तेव्हा तू कशी धापा टाकशील!”