‘मी भ्रष्ट झाले नाही, बआलदैवतांच्या मागे गेले नाही,’ असे तुला कसे म्हणता येईल? खोर्यात तू काय केले त्या तुझ्या वर्तनाचा विचार करून पाहा; तू चपळ, तरुण सांडणीसारखी इकडून तिकडे धावत आहेस.
ती रानात हिंडायला सवकलेली, कामातूर होऊन धापा टाकणारी रानगाढवी आहे; ती हातेणास आली असता तिला कोण रोखील? तिला धरायला जाणार्यांनी शिणण्याचे कारण नाही; तिच्या ऋतूत ती हाती लागेल.
आपले पाय झिजू देऊ नकोस, आपल्या घशाला कोरड पडू देऊ नकोस; पण तू म्हणालीस, ‘काय उपयोग? काही नाही; मी परक्यांवर प्रेम केले आहे, त्यांच्यामागे मी जाणार.’
चोराला पकडले म्हणजे तो जसा लाजतो तसे इस्राएलाचे घराणे लज्जित झाले आहे; ते, त्यांचे राजे, त्यांचे सरदार, त्यांचे याजक व त्यांचे संदेष्टे लज्जित झाले आहेत.
ते काष्ठास म्हणतात, ‘तू माझा बाप;’ पाषाणास म्हणतात, ‘तू मला जन्म दिलास;’ त्यांनी माझ्याकडे मुख नव्हे तर पाठ फिरवली; तरी संकटसमयी ते म्हणतील, ‘ऊठ; आमचा बचाव कर.’
तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पाहा, कारण हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे.
तर तुम्ही माझ्याशी का वाद घालता? तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, असे परमेश्वर म्हणतो.
तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.
अहो, ह्या पिढीचे लोकहो! तुम्ही परमेश्वराचे वचन लक्षात आणा; मी इस्राएलास वैराण, निबिड काळोखाचे स्थळ असा झालो आहे काय? ‘आम्ही मोकाट झालो आहोत, ह्यापुढे आम्ही तुझ्याकडे येणार नाही’, असे माझे लोक का म्हणतात?
कुमारी आपली भूषणे, नवरी आपला पोशाख विसरेल काय? तरी माझे लोक अगणित दिवस मला विसरले आहेत.
तू फार छानछोकी करून इष्कामागे कशी लागली आहेस! अशाने तू आपली चाल दुष्ट स्त्रियांनाही शिकवली आहेस.
निर्दोष, दीन जनांच्या जिवांचे रक्त तुझ्या अंगावरील वस्त्रांत सापडले आहे; ते तुझे घर फोडताना तुझ्या हाती लागले नाहीत, तर ह्या सर्वांना तुझे वर्तन कारण झाले.
तरी तू म्हणालीस, ‘मी निर्दोष आहे, त्याचा राग माझ्यावरून फिरलाच आहे;’ तू म्हणालीस, ‘मी पाप केले नाही’ म्हणून पाहा, मी तुझ्याशी दावा चालवीन.
आपली चाल बदलून इकडून तिकडे का भटकतेस? तू अश्शूरामुळे खजील झालीस तशी मिसरामुळेही होशील.
तू हातांनी आपले कपाळ बडवत त्याच्यापासूनही निघून जाशील; कारण तुझी भिस्त ज्यांच्यावर आहे त्यांना परमेश्वराने धिक्कारले आहे, व त्यांच्यायोगे तुझे कल्याण होणार नाही.