त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, “आपल्या बापाचा गोर्हा म्हणजे दुसरा गोर्हा जो सात वर्षांचा आहे तो घे; तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्या गोर्ह्याचे हवन कर.” गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोर्हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे. ते एकमेकांना विचारू लागले, “हे काम कोणी केले असावे?” विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, “हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे.” मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.” तेव्हा योवाश आपल्यावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल; तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणार्याविरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी.” म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल (बआलाने बाजू लढवावी) असे ठेवले. तो म्हणाला, “त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी.” नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्यात तळ दिला. परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले. आणि त्याने मनश्शेत सर्वत्र जासूद पाठवले तेव्हा तेही त्याला येऊन मिळाले. त्याप्रमाणेच आशेर, जबुलून व नफताली ह्यांच्याकडे त्याने जासूद पाठवले, आणि तेही त्याला येऊन मिळण्यासाठी निघाले. मग गिदोन देवाला म्हणाला, “तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्राएलाचा उद्धार करणार असलास, तर पाहा, मी ह्या खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; रात्री फक्त तिच्यावर दहिवर पडून बाकी सर्व जमीन कोरडी राहिली, तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्राएलाचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल.” तसाच प्रकार घडून आला. दुसर्या दिवशी पहाटे उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यातले दहिवर पिळून एक वाटीभर पाणी काढले. मग गिदोन देवाला म्हणाला, “माझ्यावर रागावू नकोस; मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतीती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि सार्या जमिनीवर दहिवर पडू दे.” त्या रात्री देवाने तसेच केले; म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहिवर पडले.
शास्ते 6 वाचा
ऐका शास्ते 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 6:25-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ