त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, “तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही, तर ’मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे कसे म्हणता? तुम्ही मला तीन वेळा फसवले आहे आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही.” तिच्या ह्या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला, म्हणून त्याने आपले मनोगत तिला सांगितले. तो तिला म्हणाला, “माझ्या डोक्याला कधी वस्तरा लागलेला नाही, कारण मी जन्मापासून देवासाठी नाजीर आहे; माझे मुंडण केल्यास माझी शक्ती जाईल व मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.” त्याने आपले सारे मनोगत सांगितल्याचे पाहून दलीलाने पलिष्ट्यांच्या सरदारांना बोलावणे पाठवले व सांगितले की, “आणखी एकदाच या. कारण त्याने आपले सारे मनोगत मला सांगितले आहे.” तेव्हा पलिष्ट्यांचे सरदार पैसे घेऊन तिच्याकडे आले. तिने शमशोनाला आपल्या मांडीवर झोपवले; आणि एक मनुष्य बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटांचे मुंडण करवले. मग ती त्याला सतावू लागली आणि तो निर्बल झाला. ती त्याला म्हणाली, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आले आहेत.” तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू व हातपाय झटकू असे त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे, ह्याची त्याला कल्पना नव्हती. पलिष्ट्यांनी त्याला धरून त्याचे डोळे फोडले व त्याला गज्जा येथे नेऊन काशाच्या बेड्यांनी जखडले व तुरुंगात धान्य दळायला लावले. पण त्याचे मुंडण झाल्यानंतर त्याच्या डोक्याचे केस पुन्हा वाढू लागले. नंतर पलिष्ट्यांचे सरदार आपल्या दागोन नामक देवाप्रीत्यर्थ महायज्ञ अर्पून उत्सव करण्यासाठी जमले; ते म्हणू लागले, “आपल्या देवाने आपला शत्रू शमशोन ह्याला आपल्या हाती दिले आहे.” त्याला पाहून लोक आपल्या देवाचे स्तवन करत म्हणाले, “आपल्या देवाने आपल्या देशाचा नाश करणार्या आणि आपल्यातल्या पुष्कळांचा संहार करणार्या शत्रूला आपल्या हाती दिले आहे.” ते आनंदाच्या भरात म्हणाले, “शमशोनाला समोर आणा म्हणजे तो आपली करमणूक करील.” तेव्हा त्यांनी शमशोनाला तुरुंगातून आणवले आणि तो त्यांची करमणूक करू लागला. त्यांनी त्याला खांबांमध्ये उभे केले. आपला हात धरणार्या मुलाला शमशोन म्हणाला, “ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्यांवर टेकेन.” त्या इमारतीत स्त्रीपुरुषांची खूप गर्दी झाली होती. पलिष्ट्यांचे सर्व सरदार तेथे होते. सुमारे तीन हजार स्त्रीपुरुष गच्चीवरून शमशोनाची गंमत पाहत होते. तेव्हा शमशोनाने परमेश्वराचा धावा केला : “हे प्रभू परमेश्वरा, कृपया माझी आठवण कर. हे देवा, फक्त ह्या वेळेस मला बळ दे, म्हणजे आपल्या डोळ्यांबद्दल मी पलिष्ट्यांचा एका झटक्यात बदला घेईन.” ज्या मधल्या दोन खांबांवर ती इमारत आधारलेली होती त्यांतला एक उजव्या हाताने व दुसरा डाव्या हाताने धरून त्यांवर शमशोन टेकला. “पलिष्ट्यांबरोबर मलाही मरण येवो,” असे म्हणत आपले सर्व बळ एकवटून त्याने ते खांब रेटले. तेव्हा ती इमारत त्या सरदारांवर व तेथे जमलेल्या सर्व लोकांवर कोसळली. अशा प्रकारे त्याने मरतेसमयी ठार मारलेले लोक त्याच्या सार्या हयातीत त्याने ठार मारलेल्या लोकांपेक्षा अधिक होते. मग त्याचे भाऊबंद व त्याच्या बापाचा सगळा परिवार आला व त्याला उचलून घेऊन गेला. सरा व एष्टावोल ह्यांच्या दरम्यान त्याचा बाप मानोहा ह्याच्या कबरस्थानात त्यांनी त्याला मूठमाती दिली. त्याने वीस वर्षे इस्राएलाचा न्यायनिवाडा केला होता.
शास्ते 16 वाचा
ऐका शास्ते 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 16:15-31
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ