शमशोन आपल्या आईबापासह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्यांजवळ येऊन पोहचला तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला. तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला, आणि हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही. मग त्याने जाऊन त्या मुलीशी बोलणे केले; ती शमशोनाला फार आवडली. काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आडवाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला तेव्हा त्यात मधमाश्यांचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला. त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खातखात गेला. आपल्या आईबापांकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला; तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही. मग त्याचा बाप त्या मुलीला पाहायला तिच्या घरी गेला; तेथे शमशोनाने मेजवानी दिली. त्या काळच्या तरुणांमध्ये तशी प्रथा होती. तेथल्या लोकांनी त्याला पाहून त्याच्या दिमतीस तीस लोक आणले. शमशोन त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला एक कोडे घालतो. मेजवानीच्या सात दिवसांत ते उलगडून त्याचा अर्थ तुम्ही सांगाल तर मी तुम्हांला तीस तागे व तीस पोशाख देईन. पण तुम्हांला ते उलगडता आले नाही तर तुम्ही मला तीस तागे व तीस पोशाख द्यावेत.” त्यांनी त्याला म्हटले, “सांग तुझे कोडे; आम्हांला ऐकू तर दे.” मग तो त्यांना म्हणाला, “भक्षकातून भक्ष्य व उग्रातून मधुर ते काय?” तीन दिवसपर्यंत त्यांना त्या कोड्याचा अर्थ उलगडला नाही. चवथ्या दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, “तू आपल्या नवर्याला फूस लावून त्याला ह्या कोड्याचा अर्थ सांगायला लाव, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाच्या घराला जाळून टाकू. तुम्ही आम्हांला लुबाडायला येथे बोलावले आहे, असेच ना?” नंतर शमशोनाची बायको त्याच्यापुढे रडत म्हणू लागली, “तुमचे माझ्यावर प्रेम नाही; तुम्ही माझा केवळ द्वेष करता. माझ्यावर प्रीती करत नाही. माझ्या लोकांना तुम्ही कोडे घातले, पण मला मात्र त्याचा अर्थ सांगितला नाही.” तो तिला म्हणाला, “हे पाहा, मी ते माझ्या आईवडिलांनाही सांगितले नाही, तर ते काय तुला सांगू?” मेजवानीच्या सातव्या दिवसापर्यंत ती त्याच्यासमोर रडत राहिली. तिने त्याला फारच गळ घातल्यामुळे त्याने सातव्या दिवशी ते तिला सांगितले. लगेच तिने ते कोडे आपल्या लोकांना उलगडून सांगितले. सातव्या दिवशी तो शय्यागृहात शिरण्यापूर्वी नगरवासी त्याला म्हणाले, “मधापेक्षा गोड ते काय? आणि सिंहापेक्षा उग्र ते काय?” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या कालवडीला नांगरास जुंपले नसते तर तुम्हांला माझे कोडे कधीच उलगडले नसते.” मग परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला आणि तो अष्कलोनाला गेला. तेथली तीस माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले; आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले. शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला. इकडे शमशोनाच्या सोबत्याला त्याची बायको देण्यात आली.
शास्ते 14 वाचा
ऐका शास्ते 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 14:5-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ