YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 14:1-11

शास्ते 14:1-11 MARVBSI

शमशोन तिम्ना येथे गेला; तेथे त्याने एक पलिष्टी मुलगी पाहिली. तेव्हा घरी परत येऊन आपल्या आईवडिलांकडे जाऊन तो म्हणाला, “तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे; ती मला बायको करून द्या.” त्याचे आईबाप त्याला म्हणाले, “तू त्या बेसुनत पलिष्ट्यांतली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदांत किंवा आपल्या सार्‍या लोकांत कोणी मुली नाहीत काय?” शमशोन आपल्या बापाला म्हणाला, “तीच मला मिळवून द्या; कारण माझे तिच्यावर मन बसले आहे.” पलिष्ट्यांना विरोध करण्याची संधी मिळावी म्हणून ही गोष्ट परमेश्वर करत आहे हे त्याच्या आईबापांच्या लक्षात आले नाही. त्या काळी इस्राएलावर पलिष्ट्यांची सत्ता होती. शमशोन आपल्या आईबापासह तिम्ना येथे गेला. तो तेथील द्राक्षमळ्यांजवळ येऊन पोहचला तेव्हा एक तरुण सिंह गर्जना करत त्याच्या अंगावर आला. तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर आला, आणि हातात काही हत्यार नव्हते तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले. तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही. मग त्याने जाऊन त्या मुलीशी बोलणे केले; ती शमशोनाला फार आवडली. काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आडवाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला तेव्हा त्यात मधमाश्यांचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला. त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खातखात गेला. आपल्या आईबापांकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला; तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही. मग त्याचा बाप त्या मुलीला पाहायला तिच्या घरी गेला; तेथे शमशोनाने मेजवानी दिली. त्या काळच्या तरुणांमध्ये तशी प्रथा होती. तेथल्या लोकांनी त्याला पाहून त्याच्या दिमतीस तीस लोक आणले.