YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 2:1-26

याकोब 2:1-26 MARVBSI

माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला; आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा;” आणि दरिद्र्याला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस;” तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही? पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही? जे उत्तम नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही? तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करता; आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो. कारण “व्यभिचार करू नकोस” असे ज्याने सांगितले, त्यानेच, “खून करू नकोस,” हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास, तर नियमशास्त्र उल्लंघणारा झाला आहेस. स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला व वागा. कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल; दया न्यायावर विजय मिळवते. माझ्या बंधूंनो, माझ्या ठायी विश्वास आहे, असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्यापासून काय लाभ? तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय? भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुमच्यामधील कोणी त्यांना म्हणतो, “सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा;” पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल, “तुझ्या ठायी विश्वास आहे, आणि मला क्रिया आहेत.” क्रियांवाचून तू आपला विश्वास मला दाखव, आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करतोस; भुतेही तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात. अरे बुद्धिहीन मनुष्या, क्रियांवाचून विश्वास निरर्थक आहे हे समजायला तुला हवे काय? आपला बाप ‘अब्राहाम ह्याने आपला पुत्र इसहाक ह्याला यज्ञवेदीवर अर्पण केले’ ह्यात तो क्रियांनी नीतिमान ठरला नव्हता काय? विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करत होता, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला, हे तुला दिसते. “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले;” आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले, हा शास्त्रलेख पूर्ण झाला. तर मग केवळ विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी मनुष्य नीतिमान ठरतो हे तुम्ही पाहता. तसेच राहाब वेश्या हिनेदेखील जासुदांचा पाहुणचार केला व त्यांना दुसर्‍या वाटेने लावून दिले; ह्यात ती क्रियांनी नीतिमान ठरली नाही काय? म्हणून जसे शरीर आत्म्यावाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रियांवाचून निर्जीव आहे.