YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 2:1-10

याकोब 2:1-10 MARVBSI

माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यावर विश्वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची अंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानात आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीही आला; आणि तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता, “ही जागा चांगली आहे, येथे बसा;” आणि दरिद्र्याला म्हणता, “तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बस;” तर तुम्ही आपल्यामध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनता की नाही? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही? पण तुम्ही दरिद्र्याचा अपमान केला आहे. धनवान लोक तुमच्यावर जुलूम करतात आणि तेच तुम्हांला न्यायसभेत ओढून नेतात की नाही? जे उत्तम नाव तुम्हांला प्राप्त झाले आहे त्याची निंदा तेच करतात की नाही? तथापि, “तू आपल्यासारखी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर,” ह्या शास्त्रलेखातील राजमान्य नियम तुम्ही पूर्णपणे पाळत आहात तर ते बरे करता. परंतु जर तुम्ही तोंड पाहून वागत आहात तर पाप करता; आणि उल्लंघन करणारे असे नियमशास्त्राद्वारे दोषी ठरता. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो.