यशया 8
8
संदेष्ट्याच्या पुत्राचे नाव
1परमेश्वराने मला म्हटले, “एक मोठी पाटी घेऊन तिच्यावर व्यावहारिक लिपीत असे लिही, महेर-शालाल-हाश-बज (लूट त्वरा करते, पारध घाई करते) ह्याविषयी.”
2उरीया याजक व यबरेख्याचा पुत्र जखर्या हे विश्वासू साक्षी ह्यांना मी साक्षीला ठेवतो.”
3मग मी संदेष्ट्रीशी समागम केला; ती गर्भवती होऊन तिला पुत्र झाला; तेव्हा परमेश्वराने मला म्हटले की, “त्याचे नाव महेर-शालाल-हाश-बज असे ठेव.
4कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.”
5परमेश्वराने मला पुन्हा म्हटले,
6“हे लोक संथपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारतात आणि रसीन व रमाल्याचा पुत्र ह्यांच्या सहवासात आनंद पावतात;
7ह्यास्तव प्रभू त्यांच्यावर फरात नदाच्या जलाचा प्रबल व विपुल ओघ म्हणजे अश्शूरचा राजा ह्याचा सर्व दळभार आणील; तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील;
8त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”
9अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल.
10मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1
परमेश्वराचे भय धरा
11परमेश्वराने मला आपल्या हाताने बळकट धरून असे बजावून सांगितले होते की, “ह्या लोकांच्या मार्गाने जाऊ नकोस.” तो म्हणाला : 12“हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वांना बंड बंड म्हणू नका; ज्याला ते भितात त्याला भिऊ नका, घाबरू नका.
13तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा.
14म्हणजे तो तुम्हांला पवित्रस्थान होईल; तथापि इस्राएलाच्या उभय घराण्यांत तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल.
15त्यांपैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्नभिन्न होतील, पाशांत अडकून धरले जातील.”
16माझ्या शिष्यांच्या ठायी ही साक्ष पक्की कर, हे नियमशास्त्र मुद्रित कर.”
17परमेश्वर याकोबाच्या घराण्यापासून आपले मुख फिरवतो; त्याची वाट मी पाहतो, त्याची आशा धरतो,
18पाहा, मी व परमेश्वराने मला दिलेली मुले ह्या आम्हांला सीयोननिवासी सेनाधीश परमेश्वराने इस्राएलात चिन्हे व उत्पात अशी ठेवली आहेत.
19ते तुम्हांला म्हणतील, “भूतवैद्यांना व छांछू करणार्या मांत्रिकांना विचारायला जा;” तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? जिवंतांसाठी मेलेल्यांना विचारावे काय?
20नियमशास्त्र व साक्ष ह्यांकडे पाहा! ह्याप्रमाणे ते न बोलल्यास त्यांच्यासाठी निश्चये प्रभातसमय नाही.
21ते कष्टी व क्षुधित होऊन देशात भटकतील; आणि असे होईल की त्यांना भूक लागली म्हणजे ते संतापून आपल्या राजाला व आपल्या देवाला शिव्याशाप देतील; मग आपली तोंडे ते वर करतील;
22ते पृथ्वीकडे पाहतील तर पाहा, संकट, अंधकार व दुःखाचे काहूर त्यांना दिसेल; ते निबिड काळोखात लोटले जातील.
सध्या निवडलेले:
यशया 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.