अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.” तुझ्या पोशाखाला लाली कोठून? तुझी वस्त्रे द्राक्षकुंड तुडवणार्यांसारखी का? “मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले; माझ्याबरोबर अन्य राष्ट्रांतला कोणी नव्हता; मी त्यांना आपल्या क्रोधाने तुडवले. मी त्यांना आपल्या संतापाने रगडले; त्यांचे रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले; माझ्या सर्व वस्त्रांवर डाग पडले आहेत. कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजला होता, माझ्या उद्धारकार्याचे वर्ष आले आहे. मी पाहिले पण कोणी साहाय्यकर्ता नव्हता; कोणाची अनुकूलता नव्हती म्हणून मी विस्मित झालो; तेव्हा माझ्याच बाहूने मला साहाय्य केले व माझ्या संतापाने मला आधार दिला. मी आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवले; मी त्यांना आपल्या संतापाच्या मद्याने बेहोश केले व त्यांचे रक्त भूमीवर वाहवले. परमेश्वराने आमच्यावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्राएलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यांस अनुसरून असे परमेश्वराच्या सदय कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणानुवाद गाईन. कारण तो म्हणाला, खरोखर हे माझे लोक आहेत, कधीही लबाडी करणार नाहीत अशी ही मुले आहेत; म्हणून तो त्यांचा त्राता झाला. त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले. तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले; तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला, तो स्वत: त्यांच्याशी लढला. मग त्याच्या लोकांना मोशेच्या वेळचे प्राचीन दिवस आठवले; ते म्हणाले, ज्याने त्यांना त्यांच्या कळपांच्या मेंढपाळांसह समुद्रातून बाहेर आणले तो कोठे आहे? ज्याने आपला पवित्रतेचा आत्मा त्यांच्यात घातला तो कोठे आहे? ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, मैदानातून घोडा नेतात तसे त्यांना समुद्राच्या डोहातून अडखळू न देता ज्याने नेले, तो कोठे आहे? खोर्यात उतरणार्या गुरांप्रमाणे परमेश्वराच्या आत्म्याने त्यांना विश्रांती दिली. ह्या प्रकारे आपले नाम प्रतापी व्हावे म्हणून तू आपल्या लोकांना नेले.
यशया 63 वाचा
ऐका यशया 63
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 63:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ