YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 55:3-11

यशया 55:3-11 MARVBSI

कान द्या, माझ्याकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन. पाहा, मी त्याला राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमले आहे पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल. परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा; दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत. पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्‍यास बीज, खाणार्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्यासाठी मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही.