द्वीपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या; मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले; मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले.
त्याने माझे मुख तीक्ष्ण तलवारीसारखे केले; त्याने मला आपल्या हाताच्या छायेखाली लपवले; त्याने मला चकचकीत बाणासारखे करून आपल्या भात्यात गुप्त ठेवले.
तो मला म्हणाला, “तू माझा सेवक आहेस; मला शोभा आणणारा तू इस्राएल आहेस.”
मी तर म्हणालो होतो की, “मी व्यर्थ श्रम केले, मी आपले बळ उगीच व निरर्थक वेचले; तथापि माझा न्याय परमेश्वराच्या हाती आहे; माझे प्रतिफळ माझ्या देवाच्या हाती आहे.”
मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व जो माझा देव माझे सामर्थ्य झाला,
तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”
ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”
परमेश्वर म्हणतो, “प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो.
तू बंदीत असलेल्यांना म्हणावे, ‘बाहेर या;’ अंधारात आहेत त्यांना म्हणावे ‘उजेडात या.’ ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल.
त्यांना तहानभूक लागणार नाही; झळई व ऊन ह्यांची बाधा त्यांना होणार नाही; कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झर्यांवर तो त्यांना नेईल.
मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील.
हे पाहा, हे लांबून येत आहेत; हे पाहा, हे उत्तरेकडून व पश्चिमेकडून येत आहेत; हे सीनी लोकांच्या देशातून येत आहेत.”