YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 46:1-13

यशया 46:1-13 MARVBSI

बेल खचला आहे, नबो वाकला आहे; त्यांच्या मूर्ती पाठाळांवर घातल्या आहेत; तुमच्या मिरवणुकीच्या मूर्ती थकलेल्या जनावरांवर ओझ्याप्रमाणे लादल्या आहेत. ती एकदम वाकली, खचली आहेत; त्यांना हे ओझे सावरता आले नाही. ती स्वत:च पकडून नेण्यात आली आहेत. “याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व अवशिष्ट लोकहो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले; उदरात होता तेव्हापासून तुम्हांला मी वागवले; माझे ऐका. तुमच्या वृद्धापकाळापर्यंतही मीच तो आहे; तुमचे केस पिकत तोपर्यंत मी तुम्हांला वागवीन; निर्माणकर्ता मीच आहे, वागवणारा मीच आहे, मी खांद्यांवर वागवून तुमचा बचाव करीन. माझी कोणाशी तुलना कराल? मला कोणाशी समान लेखाल? माझी कोणाशी बरोबरी कराल की जेणेकरून ते माझ्याशी समान ठरतील? जे थैलीतून सोने ओततात, जे काट्याने रुपे तोलून देतात, त्यांचे दैवत घडवण्यासाठी ते सोनारास मजुरीने लावतात, ते त्याच्या पाया पडतात, त्याला दंडवत घालतात; ते त्याला उचलून खांद्यावर घेतात, त्याला नेऊन त्याच्या स्थानी स्थापतात; तेथे तो उभा असतो, आपल्या स्थानावरून हलत नाही; त्याचा धावा केल्यास तो येत नाही, त्यांना संकटांतून तारीत नाही. अहो फितुरी लोकांनो, हे लक्षात आणून दृढ व्हा; हे ध्यानात वागवा. प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी नव्हे, माझ्यासमान कोणीच नाही. मी आरंभीच शेवट कळवतो. होणार्‍या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे, ‘माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.’ उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो. नीतिमत्तेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो, माझे ऐका. मी आपला न्याय जवळ आणत आहे, आता तो दूर नाही; माझ्याकडून होणार्‍या उद्धारास विलंब लागणार नाही; मी सीयोनेत उद्धार स्थापतो, इस्राएलास माझे गौरव देतो.”