YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 45:1-13

यशया 45:1-13 MARVBSI

परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो. “परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्राएल ह्याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे, माझ्यावेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत माझ्यावेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही. प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्नकर्ता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. हे आकाशा, वरून वृष्टी कर; आभाळ नीतिमत्तेचा पाऊस पाडो; पृथ्वी उकलो, तारण आणि नीतिमत्ता ही प्रफुल्लित होवोत; ती एकत्र उगवोत; मी परमेश्वर ह्याचा उत्पन्नकर्ता आहे. जो आपल्या उत्पन्नकर्त्याशी वाद घालतो त्याला धिक्कार असो! तो मातीच्या खापर्‍यांपैकी एक आहे. ‘तू काय करतोस’ असे माती आपल्या घडणार्‍याला म्हणेल काय? ‘तुला हात नाहीत’ असे तुझे कृत्य तुला म्हणेल काय? ‘तू काय जन्म देतोस?’ असे जो बापाला म्हणतो, आणि ‘तू काय प्रसवतेस?’ असे जो आईला म्हणतो त्याला धिक्कार असो!”’ इस्राएलाचा निर्माणकर्ता पवित्र प्रभू, परमेश्वर म्हणतो, होणार्‍या गोष्टींविषयी मला कोण विचारणार? माझे पुत्र व माझ्या हातांचे कृत्य ही पाहा, असे मला कोण सांगणार? मीच पृथ्वी केली व तिच्यावर माणसे उत्पन्न केली, मी म्हणजे माझ्या हातांनी आकाश पसरले; मी आकाशसेनेस आज्ञा दिली. मीच न्याय्य दृष्टीने कोरेशाची उठावणी केली; मी त्याचे सगळे मार्ग सरळ करीन; तो माझे नगर बांधील व काहीएक मोल अथवा मोबदला न घेता बंदिवान झालेल्या माझ्या लोकांना मुक्त करील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.