अहो द्वीपांनो, माझ्यापुढे गप्प राहा; राष्ट्रे नवीन शक्ती संपादन करोत; ती जवळ येवोत मग बोलोत; निवाडा करण्यास आपण एकत्र जमू.
ज्याच्या पावलांना नीतिमत्ता अनुसरते, अशाची उठावणी उगवतीकडून कोणी केली? राष्ट्रे त्याला वश होतील असे तो करतो; राजांवर त्याची सत्ता बसवतो, तो त्यांना धुळीसारखे त्याच्या तलवारीच्या स्वाधीन करतो, व उडणार्या धसकटाप्रमाणे त्यांना त्याच्या धनुष्याच्या स्वाधीन करतो.
तो त्यांचा पाठलाग करतो, ज्या वाटेवर त्याने कधी पाऊल ठेवले नव्हते, तिने तो बिनधोक जातो.
हे कार्य कोणी केले? ते शेवटास कोणी नेले? जो प्रारंभापासून एकामागून एक पिढ्या जन्मास आणतो त्यानेच. तो मी परमेश्वर आदी आहे व अंती असणार्यांनाही तो मीच आहे.
द्वीपे पाहून भ्याली, पृथ्वीच्या सीमा हादरल्या, ती जवळ येऊन भिडली.
त्यांतील प्रत्येकाने आपापल्या सोबत्याला साहाय्य केले, प्रत्येक आपल्या बंधूस म्हणाला, “हिंमत धर.”
ओतार्याने सोनाराला, हातोड्याने गुळगुळीत करणार्याने ऐरणीवर घण मारणार्याला, धीर दिला आणि “सांधा चांगला बसला आहे” असे म्हटले व मूर्ती ढळू नये म्हणून त्याने ती खिळ्यांनी मजबूत बसवली.
माझ्या सेवका, इस्राएला, माझ्या निवडलेल्या याकोबा, माझा मित्र अब्राहाम ह्याच्या संताना,
मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, “तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही”;
तू भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो, मी तुझे साहाय्यही करता, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.
पाहा, जे तुझ्यावर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजीत होतील; तुझ्याशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील.
तुझ्याशी लढणार्यांना तू धुंडाळशील पण ते तुला सापडायचे नाहीत; तुझ्याशी युद्ध करणार्यांचा नायनाट होईल.
कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.”
हे कीटका, याकोबा, इस्राएलाचे लोकहो, भिऊ नका, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला साहाय्य करतो; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे.
पाहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील.
तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील.
दीन व दरिद्री पाणी शोधतात पण ते कोठेच नाही; त्यांची जीभ तहानेने कोरडी पडली आहे; त्यांची विनंती मी परमेश्वर ऐकेन, मी इस्राएलाच्या देव त्यांचा त्याग करणार नाही.
मी उजाड टेकड्यांवर नद्या व खोल दर्यांतून झरे वाहवीन; मी अरण्य पाण्याचे तळे व निर्जल प्रदेश झरे करीन.