पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील. वार्यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल. तेव्हा पाहणार्यांचे डोळे मंद होणार नाहीत; ऐकणार्यांचे कान ऐकतील. उतावळ्यांच्या मनाला ज्ञानाचा उमज पडेल, तोतर्यांची जीभ अस्खलित व स्पष्ट बोलेल. मूर्खाला थोर व ठकास प्रतिष्ठित म्हणणार नाहीत. भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते. ठकाची साधनेही दुष्टतेची असतात; दीन आपल्या वाजवी हक्काचे समर्थन करीत असता ठक खोट्या शब्दांनी दुर्बलांचा नाश करण्याच्या दुष्ट युक्ती योजतो. पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो. अहो सुखात राहणार्या स्त्रियांनो, उठा, माझी वाणी ऐका; अहो निश्चिंत कन्यांनो, माझ्या बोलण्याकडे कान द्या. अहो निश्चिंत स्त्रियांनो, एका वर्षाहून काही दिवस अधिक तुम्ही बेचैन व्हाल; कारण द्राक्षांचा हंगाम बुडेल, फळे हाती लागणार नाहीत. सुखात राहणार्या स्त्रियांनो, थरथर कापा, निश्चिंत असणार्यांनो, घाबर्या व्हा, वस्त्रे फेडा, उघड्या होऊन, कंबरेस गोणपाट गुंडाळा. रम्य शेते व फलयुक्त द्राक्षांचे वेल नाहीत म्हणून त्या ऊर बडवतील. माझ्या लोकांच्या भूमीवर काटेकुसळे उगवतील; ह्या उल्लासी नगराच्या सर्व आनंदमय घरांवरही ती उगवतील. कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल. आमच्यावर आत्म्याची वृष्टी वरून होईल, तोवर असे होईल, मग अरण्य बाग होईल व बागेस वन गणतील. तेव्हा अरण्यात न्याय्यत्व वास करील व बागेत नीतिमत्ता वसेल. नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल. आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील. पण वनाचा नाश होतेवेळी गारा पडतील व शहर निखालस जमीनदोस्त करण्यात येईल. जे तुम्ही सर्व ठिकाणच्या पाण्यालगत पेरणी करता आणि बैलांना व गाढवांना मोकळेपणे फिरू देता ते तुम्ही धन्य.
यशया 32 वाचा
ऐका यशया 32
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 32:1-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ