YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 11:1-10

यशया 11:1-10 MARVBSI

इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल; परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजस-पणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही; तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील. नीतिमत्ता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल, वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील; त्यांना लहान मूल वळील. गाय व अस्वल एकत्र चरतील; त्यांचे बच्चे एकत्र बसतील; सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल, थानतुटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्‍याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.