आपल्या बंधूंना ‘अम्मी’ (माझे लोक), आपल्या भगिनींना ‘रुहामा’ (दया पावलेल्या) म्हणा.
“तुम्ही आपल्या आईची चांगली कानउघाडणी करा, तिचे कान चांगले उघडा; कारण ती माझी पत्नी नव्हे व मी तिचा पती नव्हे; ती आपले शिंदळचाळे आपल्या मुखावरून, व्यभिचाराचे प्रकार आपल्या स्तनांवरून दूर करो;
नाहीतर मी तिला वस्त्ररहित करून ती जन्माच्या दिवशी होती तशी तिला नग्न ठेवीन, तिला वैराणासारखी करीन, तिला निर्जल भूमीसारखी ठेवीन, तिला तहानेने ठार मारीन.
तिच्या मुलाबाळांवरही मी दया करणार नाही, कारण ती मुले जारकर्माची आहेत.
त्यांच्या आईने जारकर्म केले आहे, त्यांचे गर्भधारण करणारीने निर्लज्जपणाचे प्रकार केले आहेत. ती म्हणाली, ‘मला अन्न, पाणी, लोकर, ताग, तेल व पेरे पुरवणार्या माझ्या वल्लभांमागे मी लागेन.’
ह्यास्तव पाहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन.
ती आपल्या वल्लभांमागे धावेल, पण ते तिला आटोपणार नाहीत; ती त्यांचा शोध करील, पण ते तिला सापडणार नाहीत; तेव्हा ती म्हणेल, ‘मी आपल्या पहिल्या पतीकडे परत जाईन, कारण तेव्हाची माझी स्थिती आताच्यापेक्षा बरी होती.’
तिला धान्य, द्राक्षारस व तेल पुरवणारा व जे सोने, रुपे त्यांनी बआलमूर्तीसाठी वेचले त्याची रेलचेल करून देणारा तो मीच, हे तिला माहीत नाही.
म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन.
आता तिच्या वल्लभांसमक्ष तिची लाज उघडी करीन व माझ्या हातून कोणी तिला सोडवणार नाही.
तिचे सर्व उत्सव, तिच्या यात्रा, तिची चंद्रदर्शने, तिचे शब्बाथ व तिचे सर्व नेमलेले सण मी बंद करीन.
ज्या आपल्या द्राक्षालतांविषयी व अंजिराच्या झाडांविषयी ती म्हणत असे की, ‘ही माझ्या वल्लभांनी दिलेली माझी वेतने आहेत.’ ती मी उद्ध्वस्त करीन; मी त्यांचे रान बनवीन, आणि ती वनपशू खाऊन टाकतील.
बआलमूर्तींच्या दिवसांत ती त्यांच्यापुढे धूप जाळत असे, ती नथ व अलंकार ह्यांनी नटून आपल्या वल्लभांच्या मागे जात असे; ती मला विसरली, त्या दिवसांचे प्रतिफळ मी तिला देईन, असे परमेश्वर म्हणतो.