YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 4:1-12

इब्री 4:1-12 MARVBSI

म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे; ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू. कारण त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे, परंतु ऐकलेले वचन त्यांना लाभदायक झाले नाही; कारण त्याचा ऐकणार्‍यांमध्ये विश्वासाबरोबर संयोग झाला नाही. त्याची ‘कृत्ये’ जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली. तथापि, “त्याप्रमाणे मी रागाने शपथ वाहून म्हणालो, ‘हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत;”’ असे ज्या ‘विसाव्याविषयी,’ त्याने सांगितलेले आहे त्यात, ज्या आपण विश्वास ठेवला आहे ते ‘आपण प्रवेश करत आहोत.’ कारण सातव्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की, “सातव्या दिवशी देवाने आपल्या सर्व कृत्यांपासून विसावा घेतला.” आणि ह्या ठिकाणी पुन्हा म्हटले आहे की, “हे माझ्या विसाव्यात निश्‍चित येणार नाहीत.” कोणीतरी ‘त्यात यायचे होते,’ ते राहिले आहेत; आणि ज्यांना पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवज्ञेमुळे ‘त्यात आले’ नाहीत; म्हणून तो पुन्हा ‘आज’ हा एक दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दाविदाच्या द्वारे म्हणतो की, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली मने कठीण करू नका.” कारण यहोशवाने त्यांना विसावा दिला असता तर त्यानंतर तो (देव) दुसर्‍या दिवसाविषयी बोलला नसता. म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. कारण जो ‘कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे’ त्यानेही, जसा ‘देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला’, तसा ‘आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे.’ म्हणून त्या ‘विसाव्यात येण्याचा’ आपण होईल तितका प्रयत्न करावा, ह्यासाठी की, त्यांच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.