इब्री 11
11
विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणे
1विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणार्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.
2विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती.
3विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की, जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही.
4विश्वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष ‘देवाने दानाच्या वेळी’ दिली; आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे.
5हनोखाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले, आणि ‘तो सापडला’ नाही; ‘कारण त्याला देवाने लोकांतरी नेले;’ लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की, ‘तो देवाला संतोषवीत असे;’
6आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.
7तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले, आणि विश्वासाने प्राप्त होणारे जे नीतिमत्त्व त्याचा तो वतनदार झाला.
8अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला.’
9परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने ‘जाऊन राहिला;’ त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर डेर्यात त्याची वस्ती होती.
10कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.
11वयोमर्यादेपलीकडे असताही सारेलादेखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली [व ती संतान प्रसवली], कारण तिने वचन देणार्यास विश्वसनीय मानले.
12त्यामुळे एकापासून, आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून, संख्येने ‘आकाशातल्या तार्यांइतकी, व समुद्रतीरावरील वाळूइतकी अगणित’ संतती निर्माण झाली.
13हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण ‘पृथ्वीवर परके व प्रवासी’ आहोत असे पत्करले.
14असे म्हणणारे आपण स्वतःच्या देशाचा शोध करत असल्याचे दाखवतात.
15ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती.
16पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात; ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यायला देवाला त्यांची लाज वाटत नाही; कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे.
17‘अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले;’ ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या ‘एकुलत्या एक पुत्राचे’ अर्पण करत होता;
18त्याला असे सांगितले होते की, “इसहाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील.”
19तेव्हा मेलेल्यांतूनदेखील उठवण्यास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.
20इसहाकाने याकोबाला व एसावाला पुढे होणार्या गोष्टींविषयीसुद्धा विश्वासाने आशीर्वाद दिला.
21याकोबाने मरतेवेळेस योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला; आणि ‘आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले.’
22योसेफाने मरतेवेळेस इस्राएलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्थींविषयी आज्ञा केली.
23‘मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला तीन महिने लपवून ठेवले,’ कारण ते मूल ‘सुंदर आहे असे त्यांनी पाहिले;’ व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही.
24‘मोशे प्रौढ झाल्यावर’ त्याने आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले.
25पापाचे क्षणिक सुख भोगणे ह्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले.
26‘ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे’ ही मिसर देशातील धनसंपत्तीपेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले; कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती.
27त्याने राजाच्या क्रोधाला न भिता विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.
28त्याने ‘वल्हांडण सण’ व ‘रक्तसिंचन’ हे विधी विश्वासाने पाळले, ते अशा हेतूने की, प्रथमजन्मलेल्यांचा ‘नाश करणार्याने’ त्यांना शिवू नये.
29जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले; मिसरी लोक तसेच करण्याचा प्रयत्न करत असता बुडून गेले.
30विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती सात दिवस फेर्या घालण्यात आल्यावर ते पडले.
31राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणार्यांबरोबर तिचा नाश झाला नाही.
32आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इफ्ताह, दावीद, शमुवेल व संदेष्टे ह्यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही.
33त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली,
34अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.
35स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणांस अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले.
36आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला.
37त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते;
38त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.
39ह्या सर्वांबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही;
40त्यांनी आपणावाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते.
सध्या निवडलेले:
इब्री 11: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.