YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 10:19-39

इब्री 10:19-39 MARVBSI

म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आणि आपल्याकरता ‘देवाच्या घरावर एक थोर याजक आहे; म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे; आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा. कारण सत्याचे ज्ञान मिळाल्यावर आपण बुद्धिपुरस्सर पाप केले तर पापांबद्दल ह्यापुढे यज्ञ व्हायचा राहिला नाही; तर न्यायाची आणि विरोध्यांस गिळंकृत करील अशा अग्नीच्या भडक्याची एक प्रकारची धास्ती एवढेच. मोशेच्या नियमशास्त्राचा कोणी भंग केला तर त्याच्यावर दया न होता ‘त्याला दोघांच्या किंवा तिघांच्या साक्षीवरून मरणदंड होतो.’ तर ज्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडवले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता ते ‘कराराचे रक्त’ ज्याने अपवित्र मानले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांला वाटते? कारण “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन; असे प्रभू म्हणतो.” आणखी, “परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,” असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहीत आहे. जिवंत देवाच्या हाती सापडणे हे भयंकर आहे. पूर्वीचे दिवस आठवा; त्यांमध्ये तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली; कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला; तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झालात. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात]आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हांला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण “अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही; माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही.” परंतु ज्यांचा नाश होईल अशा ‘माघार घेणार्‍यांपैकी’ आपण नाही; तर जिवाच्या तारणासाठी ‘विश्वास ठेवणार्‍यांपैकी’ आहोत.