YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 10:1-18

इब्री 10:1-18 MARVBSI

तर मग ज्या पुढे होणार्‍या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे, वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पण केल्या जाणार्‍या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणार्‍यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय? परंतु त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्षे पापांची आठवण होत आहे; कारण बैलांचे व बकर्‍यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून तो जगात येतेवेळेस म्हणाला, “यज्ञ व अन्नार्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केलेस; होमांनी व पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.” वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, “यज्ञ, अन्नार्पणे, होम व पापाबद्दलची अर्पणे ह्यांची इच्छा तुला नव्हती व त्यांत तुला संतोष नव्हता” (ती नियम-शास्त्राप्रमाणे अर्पण करण्यात येतात); मग तो म्हणाला, “[हे देवा,] पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे.” ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत. प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे यज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो; परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’ आणि तेव्हापासून ‘आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत’ वाट पाहत आहे. कारण पवित्र होणार्‍यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो, कारण हे म्हटल्यावर, परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.” आणि “त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही.” तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे राहिले नाही.