YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 9:1-19

उत्पत्ती 9:1-19 MARVBSI

मग देवाने नोहाला व त्याच्या पुत्रांना आशीर्वाद देऊन म्हटले : “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी, भूमीवर रांगणारे सर्व प्राणी व समुद्रातील सर्व मासे ह्यांना तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या स्वाधीन केले आहेत. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील; वनस्पती ज्याप्रमाणे तुम्हांला दिली होती त्याप्रमाणे सर्वकाही आता तुम्हांला देतो. तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका. मी तुमच्या रक्ताबद्दल म्हणजे तुमच्या जिवाबद्दल झडती घेईन; प्रत्येक पशूची व मनुष्याची झडती घेईन; प्रत्येक मनुष्याची त्याच्या भावाच्या जिवाबद्दल झडती घेईन. जो कोणी मनुष्याचा रक्तपात करील त्याचा रक्तपात मनुष्याकडून होईल; कारण देवाने मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा उत्पन्न केला आहे. तुम्ही फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा; पृथ्वीवर विपुल वंशवृद्धी करा, तिच्यावर बहुगुणित व्हा.” देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या मुलांना म्हणाला, “पाहा, मी तुमच्याशी व तुमच्यामागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो; त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशू व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी ह्यांच्याशीही मी करार करून ठेवतो. तुमच्याशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणिमात्र नष्ट होणार नाहीत, आणि पृथ्वीनाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही.” देव म्हणाला, “माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये, त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असणार्‍या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या, युगानुयुग राहणारा जो करार मी करत आहे त्याचे चिन्ह हे : मी मेघांत धनुष्य ठेवले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यांत धनुष्य दिसेल, तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी ह्यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि ह्यापुढे सर्व देहधार्‍यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही. धनुष्य मेघांत दिसेल ते पाहून माझ्यामध्ये आणि पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांमध्ये झालेल्या युगानुयुग राहणार्‍या कराराचे मला स्मरण होईल.” देव नोहाला म्हणाला, “माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व प्राणी ह्यांच्यामध्ये जो करार मी करून ठेवला आहे त्याचे हे चिन्ह होय.” नोहाचे मुलगे तारवाबाहेर निघाले. त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती; हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे तीन मुलगे; ह्यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला.