YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 8:1-12

उत्पत्ती 8:1-12 MARVBSI

मग देवाने नोहा व तारवात त्याच्याबरोबर असलेले वनपशू आणि ग्रामपशू ह्या सर्वांची आठवण केली; देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले; जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली, आणि आकाशातून पावसाची झोड थांबली, पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले; दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले. सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी अरारात पर्वतावर तारू टेकले. दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते; दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले. ह्याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवास जी खिडकी केली होती ती उघडली, आणि एक कावळा बाहेर सोडला; तो पृथ्वीवरील पाणी सुकेपर्यंत इकडेतिकडे फिरत राहिला. पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबुतर बाहेर सोडले. त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवात परत आले; कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापि पाणी होते; तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले. त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन: बाहेर सोडले. सायंकाळी ते कबुतर त्याच्याकडे आले, आणि पाहा, त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले; नोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे. त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला सोडले, ते त्याच्याकडे परत आले नाही.