YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 7:1-16

उत्पत्ती 7:1-16 MARVBSI

मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. सर्व शुद्ध पशूंपैकी सातसात नरमाद्या आणि अशुद्ध पशूंपैकी दोन-दोन नरमाद्या, आणि आकाशातील पक्ष्यांपैकी सातसात नरमाद्या बरोबर घे; अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील. अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार, आणि मी केलेले सर्वकाही भूतलावरून नाहीसे करणार.” तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केले. पृथ्वीवर जलप्रलय झाला त्या वेळी नोहा सहाशे वर्षांचा होता. हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना ह्यांना घेऊन तारवात गेला. शुद्ध-अशुद्ध पशुपक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी ह्यांतून नर व मादी अशी जोडीजोडीने, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याच्याकडे गेली. सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले. नोहाच्या वयाच्या सहाशेव्या वर्षी दुसर्‍या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली. ह्याच दिवशी नोहा, आणि त्याचे पुत्र शेम, हाम व याफेथ, आणि त्यांच्याबरोबर नोहाची बायको व त्याच्या तिघी सुना हे तारवात गेले. हे आणि प्रत्येक जातीचे वनपशू, प्रत्येक जातीचे ग्रामपशू, प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातींचे पक्षी तारवात गेले. सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक जोडी नोहाकडे तारवात गेली. देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यांपैकी एकेक नरमादी आत गेली; मग परमेश्वराने त्याला आत बंद केले.