ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेथ असे तीन मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर; त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करायचे ते असे : त्याची लांबी तीनशे हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी. तारवाला उजेडासाठी खिडकी कर; तिचा माथा वरपासून एक हात असेल अशी कर; तारवाच्या एका बाजूला दार ठेव; त्याला खालचा; दुसरा व तिसरा असे मजले कर. पाहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल; तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो, तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना ह्यांना घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन-दोन जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणार्या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्याजवळ आणून त्याचा साठा कर; ते तुला व त्यांना खायला मिळेल.”
उत्पत्ती 6 वाचा
ऐका उत्पत्ती 6
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 6:9-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ