YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 6:5-22

उत्पत्ती 6:5-22 MARVBSI

पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले; म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन; मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे.” परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला. नोहाला शेम, हाम व याफेथ असे तीन मुलगे झाले. त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती. देवाने पृथ्वीकडे अवलोकन केले तर पाहा, ती भ्रष्ट होती; कारण पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांनी आपली चालचलणूक बिघडवली होती. मग देव नोहाला म्हणाला, “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जाचजुलूम माजला आहे. पाहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर; त्या तारवात कोठड्या कर आणि त्याला आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करायचे ते असे : त्याची लांबी तीनशे हात, रुंदी पन्नास हात व उंची तीस हात असावी. तारवाला उजेडासाठी खिडकी कर; तिचा माथा वरपासून एक हात असेल अशी कर; तारवाच्या एका बाजूला दार ठेव; त्याला खालचा; दुसरा व तिसरा असे मजले कर. पाहा, ज्यांच्या ठायी प्राण आहे असे सर्व देहधारी आकाशाखालून नाहीसे करावे म्हणून मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल; तरी तुझ्याशी मी आपला करार स्थापित करतो, तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना ह्यांना घेऊन तारवात जा. सर्व प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून नर व मादी अशी दोन-दोन जिवंत राखण्यासाठी आपल्याबरोबर तारवात ने. पक्ष्यांच्या प्रत्येक जातीतून, पशूंच्या प्रत्येक जातीतून आणि भूमीवर रांगणार्‍या प्राण्यांच्या प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणरक्षणार्थ तुझ्याकडे येतील. खाण्यात येते ते सर्व प्रकारचे अन्न आपल्याजवळ आणून त्याचा साठा कर; ते तुला व त्यांना खायला मिळेल.” नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.