YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 50:15-26

उत्पत्ती 50:15-26 MARVBSI

आपला बाप मरण पावला हे मनात आणून योसेफाचे भाऊ म्हणू लागले, “आता योसेफ कदाचित आमचा द्वेष करील व आपण त्याचे जे वाईट केले त्याचे तो पुरे उट्टे काढील.” त्यांनी योसेफाला सांगून पाठवले की, “आपल्या बापाने मरणापूर्वी आम्हांला आज्ञा केली ती अशी : तुम्ही योसेफाला सांगा, तुझ्या भावांनी तुझे वाईट केले हा त्यांचा अपराध व पातक ह्यांची क्षमा कर; आता आपल्या बापाच्या देवाचे जे आम्ही दास, त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो.” हे त्यांचे भाषण ऐकून योसेफाला रडू आले. तेव्हा त्याचे भाऊ स्वत: त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून म्हणाले, “आम्ही आपले दास आहोत.” योसेफ त्यांना म्हणाला, “भिऊ नका, मी का देवाच्या ठिकाणी आहे? तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचावे म्हणून देवाने ते चांगल्यासाठीच योजले होते. तर आता भिऊ नका; मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करीन.” ह्या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले. योसेफ आणि त्याच्या बापाचे घराणे मिसर देशात राहिले. तो एकशे दहा वर्षे जगला. योसेफाने एफ्राइमाच्या तिसर्‍या पिढीतली मुले पाहिली; तसेच मनश्शेचा मुलगा माखीर ह्याची मुले त्याने आपल्या मांडीवर घेतली. नंतर योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी आता मरणार; देव खरोखर तुमची भेट घेईल. जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांना त्याने शपथपूर्वक देऊ केला आहे त्यात तुम्हांला ह्या देशातून घेऊन जाईल.” मग योसेफाने इस्राएल वंशजांना शपथ घालून म्हटले, “देव खरोखर तुमची भेट घेईल तेव्हा तुम्ही माझ्या अस्थी येथून घेऊन जा.” योसेफ एकशे दहा वर्षांचा होऊन मृत्यू पावला; त्यांनी त्याच्या प्रेतात मसाला भरून ते पेटीत घालून मिसर देशात ठेवले.