YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 42:29-38

उत्पत्ती 42:29-38 MARVBSI

मग ते कनान देशात आपला बाप याकोब ह्याच्याकडे जाऊन पोहचले आणि आपला सर्व वृत्तान्त त्यांनी त्याला सांगितला तो असा : त्या देशाचा अधिपती आमच्याशी कठोरपणे बोलला व त्याने आम्हांला देश हेरणारे ठरवले. आम्ही त्याला म्हणालो, ‘आम्ही सरळ माणसे आहोत, आम्ही हेर नाही, आम्ही बारा भाऊ आमच्या बापाचे मुलगे आहोत, एक नाहीसा झाला आणि सर्वांत धाकटा आजमितीस कनान देशात आमच्या बापाजवळ आहे.’ ह्यावर तो मनुष्य म्हणजे देशाचा अधिपती आम्हांला म्हणाला, ‘तुम्ही सरळ माणसे आहात, अशी माझी खात्री होण्यास एवढे करा की, तुम्हा भावांतल्या एकाला माझ्याजवळ राहू द्या, आणि आपल्या घरच्यांची उपासमार निवारण्यासाठी तुम्ही धान्य घेऊन परत जा. तुम्ही आपल्या धाकट्या भावाला घेऊन या म्हणजे मला खात्री पटेल की तुम्ही हेर नाही, तर सरळ माणसे आहात; मग तुमचा भाऊ मी तुम्हांला परत देईन आणि तुम्हांला ह्या देशात येजा करता येईल.’ ते आपल्या गोण्या रिकाम्या करत असता प्रत्येकाची पैशाची थैली ज्याच्या-त्याच्या गोणीत आढळली; त्यांनी व त्यांच्या बापाने त्या पैशांच्या थैल्या पाहिल्या तेव्हा ते फार घाबरले. त्यांचा बाप याकोब त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी व माझ्या मुलांची ताटातूट केली आहे; योसेफ नाहीसा झाला, शिमोन नाही आणि तुम्ही बन्यामिनालाही घेऊन जाऊ पाहता; माझ्यावर ही सर्व अरिष्टे आली आहेत.” मग रऊबेन आपल्या पित्याला म्हणाला, “मी जर त्याला तुमच्याकडे घेऊन आलो नाही तर माझे दोन मुलगे मारून टाका; त्याला माझ्या हवाली करा, मी त्याला परत तुमच्याकडे आणीन.” तो म्हणाला, “माझ्या मुलाला मी तुमच्याबरोबर पाठवणार नाही, कारण त्याचा भाऊ मेला आहे आणि तो एकटाच राहिला आहे; ज्या मार्गाने तुम्ही जात आहात त्यात त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दु:खी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरवायला कारण व्हाल.”