YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 4:17-26

उत्पत्ती 4:17-26 MARVBSI

काइनाने आपल्या बायकोस जाणले, आणि ती गर्भवती होऊन तिला हनोख झाला; काइनाने एक नगर बांधले; त्याचे नाव त्याने आपल्या मुलाच्या नावावरून हनोख असे ठेवले. हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला; महूयाएलास मथुशाएल झाला आणि मथुशाएलास लामेख झाला. लामेखाने दोन बायका केल्या; पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला. आदा हिला याबाल झाला; तो पाल देऊन राहणारे व गुरेढोरे पाळणारे ह्यांचा मूळ पुरुष झाला. त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते; तो तंतुवाद्ये व वायुवाद्ये वाजवणार्‍या सर्वांचा मूळ पुरुष झाला. सिल्ला हिलाही तुबल-काइन झाला; तो तांब्याची, लोखंडाची व सर्व प्रकारची धारदार हत्यारे घडवणारा झाला; आणि तुबल-काइनास नामा नावाची बहीण होती. लामेख आपल्या बायकांना म्हणाला, “आदा आणि सिल्ला, तुम्ही माझी वाणी ऐका, लामेखाच्या बायकांनो, माझ्या भाषणाकडे कान द्या; एका पुरुषाने मला घाय केला, एका तरुणाने मला प्रहार केला, म्हणून मी त्याला ठार मारले. काइनाबद्दल सातपट सूड घ्यायचा तर लामेखाबद्दल सत्त्याहत्तरपट घेण्यात येईल.” आदामाने आपल्या बायकोस पुन: जाणले, आणि तिला मुलगा झाला; त्याचे नाव तिने शेथ ठेवले; ती म्हणाली, “काइनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे.” शेथ ह्याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने अनोश असे ठेवले; त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले.