YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 39:1-9

उत्पत्ती 39:1-9 MARVBSI

इकडे योसेफाला मिसरात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिसर्‍याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली; योसेफ त्याची सेवा करू लागला; आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्वकाही त्याच्या ताब्यात दिले. आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्वकाही केले; तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिसर्‍याच्या घरादाराचे कल्याण केले; त्याचे घरदार व शेतीवाडी ह्या सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. त्याने आपले सर्वकाही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्यापलीकडे आपले काय आहे ह्याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता. त्यानंतर असे झाले की, योसेफाच्या धन्याची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून त्याला म्हणाली, “माझ्यापाशी नीज.” पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, “हे पाहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे ह्याचे माझ्या धन्याला भानसुद्धा नाही; आपले सर्वकाही त्याने माझ्या हाती दिले आहे. ह्या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत; आणि तुम्ही त्यांची पत्नी आहात म्हणून तुमच्याखेरीज त्यांनी माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही, असे असता एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?”